प्रणयच्या हत्येनंतर आता त्याच्या पुतळ्यावरून वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तेलंगणातील नालगोंडा येथे प्रणय पेरुमुल्ला या २३ वर्षीय दलित तरुणाची ऑनर किलींगमधून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सवर्ण तरुणीशी लग्न केल्याने तिच्या वडिलांनी त्याची हत्या घडवून आणल्याचे समोर आले होते. जातीच्या वादातून प्रणयची हत्या झाल्यानंतर आता त्याच्या पुतळ्यावरून देखील जाती जातींमध्ये वाद निर्माण झाला आहे. प्रणयची पत्नी अमृताने त्याचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. सवर्णांच्या संघटनांनी तिच्या या मागणीला विरोध केला आहे.

तेलंगणातील ऑनरकिलिंग, एक कोटींची सुपारी; ‘आयएसआय’ कनेक्शन

प्रणयची बायको अमृताने मिऱ्यालागुडा शहरात प्रणयचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. मिऱ्यालागुडा शहराच्या महानगरपालिकेचे आयुक्त सी.सत्या बाबू यांच्याकडे प्रणयच्या कुटुंबीयांनी याबाबतचा अर्ज दिला आहे. तिची ही मागणी पूर्ण करण्यासाठी दलित संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मात्र काही संघटनांनी या मागणीला विरोध करत सार्वजनिक ठिकाणी हा पुतळा उभारण्यात येऊ नये असं म्हटलंय. पोलीस प्रशासन, महानगरपालिका, रस्ते आणि बांधकाम विभागाने देखील प्रणयच्या पुतळ्याला विरोध केला आहे. प्रणयचा पुतळा बांधल्याने समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता तेलंगणा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

‘प्रणयची हत्या ही दोन कुटुंबातील वादातून झाली आहे. आम्ही त्या्च्या हत्येचा निषेध करतो. प्रणयच्या कुटुंबाचे दुख आम्ही समजतो, ते त्यांच्या घराच्या परिसरात त्याचा पुतळा उभारू शकतात पण सार्वजनिक ठिकाणी प्रणयचा पुतळा उभारणे आम्हाला मान्य नाही. यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल’, असे भाजपचे नेते श्याम चिलुकुरी यांनी सांगितले.