
ठाण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या गडकरी रंगायतनचे ३१ कोटी रुपये खर्च करून महापालिकेने नूतनीकरण केले. पण ज्या शिवसेनाप्रमुखांच्या पुढाकारामुळे रंगायतन उभे राहिले त्यांच्याच नावाची कोनशिला मुजोर प्रशासनाने अडगळीत टाकली. शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाची तंतरली असून आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची पाटी पुन्हा दिमाखात झळकली आहे. अडगळीत टाकलेली कोनशिला दर्शनी भागात लावण्यात आली आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षक आणि ठाणेकरांना गडकरीत पाऊल टाकताक्षणी पुन्हा शिवसेनाप्रमुखांचे स्मरण होणार असून ठाण्यातील शिवसैनिक व नाट्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
१९९९ मध्ये गडकरीचे नूतनीकरण केल्यानंतर पुन्हा दिमाखात हे सांस्कृतिक वैभव ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची कोनशिला दर्शनी भागात बसवली होती. रसिक, कलाकार हे गडकरीमध्ये प्रवेश करताना त्यांना या कोनशिलेचे दर्शन होत होते. यानिमित्ताने अनेकांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळादेखील दिला.
शिवसैनिक आक्रमक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन कोनशिला दर्शनी भागात लावली नाही तर आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा दिला होता. या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर पालिकेने ही पाटी पुन्हा मोठ्या दिमाखात दर्शनी भागात झळकवली आहे.
नूतनीकरण केले पण…
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा एकदा नूतनीकरणासाठी रंगायतन बंद करण्यात आले. या वास्तूचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी केले. गडकरीची डागडुजी करीत असताना शिवसेनाप्रमुखांचे नाव असलेली दर्शनी भागातील कोनशिला अडगळीत टाकण्यात आली. कोनशिलेच्या पुढे एक भिंत उभारण्यात आली.
शिवसेनाप्रमुखांनी रंगायतनच्या रूपाने ठाणेकरांना दिलेली भेट अमूल्य आहे. शिवसेनाप्रमुखांचे नाव असलेली कोनशिला अडगळीत टाकण्याची प्रशासनाची हिंमतच कशी झाली? शिवसेनाप्रमुखांचे नाव पुसण्याचा डाव होता काय? की त्यांना कोणी आदेश दिले! कोण हे गद्दार? बाळासाहेब आणि धर्मवीरांचे नाव घेऊन स्वतःची पापे लपवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. पुन्हा जर असे घडले तर याद राखा!
– राजन विचारे, शिवसेना नेते, माजी खासदार