विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या. पाठीवर नवीन दप्तर, नवी पुस्तके, नवा गणवेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांची स्वारी घोडय़ावरून शाळेत दाखल झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळांनी विद्यार्थ्यांचे ढोलताशा आणि लेझीमच्या गजरात गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. शाळेत नव्यानेच नर्सरीत दाखल होणाऱ्या चिमुकल्यांचे चेहरे मात्र थोडे रडपुंडीला आले होते.

यंदाचे शैक्षणिक वर्ष शालेय विद्यार्थ्यांसाठी खास आहे. यंदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले असून त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाची तयारी सुरू झाली आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठय़पुस्तक योजनेंतर्गत पाठय़पुस्तके देण्यात येणार आहे. या पुस्तकांना वह्यांची पाने जोडली असून यात विद्यार्थ्यांना माझी नोंद शीर्षकाखाली पुस्तकातच महत्त्वाच्या नोंदी, टीपण काढता येणार आहे.

शाळेचा पहिलाच दिवस असल्याने आज बहुसंख्य शाळा अर्धा दिवसच भरल्या. शिक्षकांची ओळख, पाठय़पुस्तकांचे वाटप, शाळा प्रवेशोत्सव साजरा करून शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.