
सध्याच्या घडीला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील अक्षय खन्नाचा स्वॅग इतका प्रभावी आहे की लोकांना त्याच्यावरून नजर हटवणे कठीण आहे. नृत्य असो किंवा दमदार संवाद असो. अक्षय खन्ना प्रत्येक फ्रेममध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. धुरंधर चित्रपटानंतर आता अक्षयचा भाव चांगलाच वधारला आहे. या चित्रपटाच्या यशामुळे चित्रपट निर्मात्यांमध्ये अक्षय चित्रपटात असायला हवा असा प्रयत्न सुरु झालेला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून अक्षय खन्ना आता दृश्यम ३ या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु आता मात्र मिळालेल्या माहितीनुसार अक्षय खन्नाने त्याचे मानधन वाढवल्यामुळे दृश्यम ३ च्या निर्मात्यांशी त्याचे मतभेद झाले आहेत.
हाती आलेल्या बातमीनुसार, अक्षय खन्नाने दृश्यम ३ या चित्रपटामधून स्वतः माघार घेतल्याचे म्हटले जात आहे. बॉलीवूड मशीनने दिलेल्या वृत्तानुसार, धुरंधरच्या जबरदस्त यशानंतर अक्षय खन्नाने त्याच्या मानधनात लक्षणीय वाढ करण्याची मागणी केल्याचा दावा या बातमीमध्ये करण्यात आलेला आहे. तसेच मानधना व्यतिरिक्त त्याने दृश्यम ३ मधील त्याच्या ऑनस्क्रीन लूकमध्येही महत्त्वाचे बदल करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांमुळेच सध्याच्या घडीला अक्षय खन्नाचे निर्मात्यांशी मतभेद झाले आहेत. त्यामुळे त्याने चित्रपटाकडे पाठ वळवली आहे असे म्हटले जात आहे. याबाबत कोणतेही खात्रीशीर वृत्त अजून निर्मात्यांकडून आलेले नाही.
धुरंधरच्या यशानंतर अक्षयची मागणी वाढल्याने, त्याला न घेणे हा निर्मात्यांसाठी तोट्याचा प्रस्ताव ठरू शकतो. चित्रपटाची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.


























































