
चिनी वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अचानक नरमले आहेत. चीनवरील टॅरिफ कमी करण्याचे किंवा पूर्णपणे हटवण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.
‘चीनचे अध्यक्ष शी यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. काही बाबतीत आमचे मतभेद जरूर आहेत. टॅरिफच्या माध्यमातून चीन सध्या आम्हाला भरपूर पैसे देत आहे. त्यांना हे भारी पडत असेल. त्यामुळे टॅरिफ कमी व्हावे असे चीनला वाटत असेल. मी त्यावर विचार करतो आहे, मात्र हे एकाच बाजूने शक्य नाही. त्या बदल्यात चीनलाही आमच्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील, असे ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिकेला काय हवे?
चिनी मालावरील टॅरिफ घटवण्याच्या बदल्यात चीनने अमेरिकेकडून जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी करावे, दुर्मिळ खनिजांवरील निर्बंध उठवावेत आणि सुरक्षेशी संबंधित अमेरिकेच्या काही तक्रारींची दखल घ्यावी, अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे.
आयात ट्रक्सवर 25 टक्के टॅरिफ
बाहेरच्या देशातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱया ट्रक्ससह मध्यम व अवजड वाहनांवर आणि या वाहनांच्या स्पेअर पार्टस्वर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय ट्रम्प सरकारने घेतला आहे.