बीडमध्ये राणे यांच्या वक्तव्याचा निषेध; वडवणीमध्ये पुतळा जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याबदल वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना माजी तालुका प्रमुख विनायक मुळे यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी उपस्थित शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विनायक मुळे, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक प्रमिला माळी, शहर प्रमुख नागेश डिगे, ज्येष्ठ शिवसैनिक बंडू जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बीडमध्ये राणेंच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. संतप्त शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राणे यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसैनिकांमध्ये संताप आहे. जिल्ह्यात राणेंच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहेत.

उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि युवासेनेचे जिल्हाधिकारी सागर बहीर यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरातील ठिकठिकाणी नारायण राणे यांचा निषेध करणारे पोस्टर लावण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. ठिकठिकाणी बॅनर जाळण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू होती. गणेश वरेकर यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये राणेंच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे.