
वेळापूर येथील इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शुक्रवारी झालेल्या अत्याचारातील आरोपींना अटक करून जलद न्यायालयात खटला चालवावा आणि त्यांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी ‘रास्ता रोको’चा इशारा देण्यात आला आहे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, भिमक्रांती ग्रुप यासह वेळापूर, सुरेगाव, कोळगाव, थडी, गौतमनगर, कोळपेवाडी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागांमध्ये मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असून शुक्रवारी अशाच प्रकारची घटना वेळापूर येथील नऊ वर्षाच्या मुलीसोबत घडली. पिडीत मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेतील आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांना तातडीने पकडण्यात येऊन जलद न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवावा व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी गाव बंद व रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मंगळवारी सकाळी वेळापूर, सुरेगाव, कोळगाव, थडी, गौतम नगर व कोळपेवाडी या गावात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, भिमक्रांती ग्रुप आणि गावातील ग्रामस्थांच्या वतीने बंद पाळण्यात येणार असून 11 वाजता शिर्डी -लासलगाव या रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन समाज कल्याण शाखेचे प्रधान सचिव (मुंबई), विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक), पोलीस अधीक्षक (नगर), जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, तहसीलदार योगेश चंद्रे, आमदार आशुतोष काळे यांना पाठविण्यात आले आहे.




























































