नगर-पाथर्डी महामार्गावर ग्रामस्थांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांबोरी चारीचे पाणी मढी तलावात तात्काळ सोडावे तसेच या योजनेत निवडूंगे गावातील तलावाचा समावेश करावा, या मागणीसाठी गुरुवारी निवडुंगे व मढी येथील ग्रामस्थांनी नगर -पाथर्डी महामार्गावर निवडूंगे येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या योजनेशी संबंधित अधिकारी पूर्वकल्पना देऊनही आंदोलनस्थळी न आल्याने आंदोलक संतप्त झाले होते. नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल व आठ दिवसात पाणी सोडले जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वांबोरी चारी योजनेत मढी गावाचा समावेश आहे. मात्र अजूनही या ठिकाणच्या तलावात चारीचे पाणी येत नाही. तसेच या योजनेत अजूनही निवडुंगे गावातील तलावाचा समावेश नसल्याने दुष्काळाच्या तीव्र झळा या दोन्हीही गावांना सोसाव्या लागत आहेत. मढी व निवडुंगे येथे वांबोरी चारीचे पाणी मिळावे अशी मागणी या पूर्वी दोन्हीही गावातील ग्रामस्थांनी अनेकवेळा केली आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने गुरुवारी निवडुंगे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात निवडुंगेचे माजी सरपंच आसाराम ससे, भगवान मरकड ,निवडुंगेच्या उपसरपंच सुवर्णा मरकड , सविता ससे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी बोलताना आसाराम ससे म्हणाले की, शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करूनही मढी तलावात अजूनही पाणी आले नाही. फक्त आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने कुठपर्यंत करायची आणि किती दिवस करायची, आता हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. निवडूंगे गावच्या तलावाची अधिकारी केवळ पाहणी करून गेले. मात्र, अद्यापही उपाययोजना केल्या नाहीत. मढी तलावात तातडीने पाणी सोडावे व निवडूंगे गावाचा या योजनेत समावेश करावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ससे यांनी दिला. या आंदोलनाकडे वांबोरी चारीशी संबंधित असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने आंदोलकांनी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. नेवसे व योजनेचे उपअभियंता एस. जे. चिंचोलकर यांनी वरिष्ठ अभियंता मोरे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधल्यानंतर मोरे यांनी येत्या आठ दिवसात मढी व निवडुंगे येथे वांबोरी चारीचे पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. यानंतर येत्या आठ दिवसात पाणी सोडण्यात येईल तसेच गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पंकज नेवसे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जवळपास दोन तास आंदोलन सुरू असल्याने वाहतूक खोळंबली होती.