दमदाटीच्या विरोधात माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर परिवर्तन मंडळाची निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या सत्ताधारी मंडळाच्या ज्येष्ठ संचालकाच्या बंधूने सोसायटीचे माजी चेअरमन सुनिल काकडे यांना शिवीगाळ करुन धमकाविल्याच्या निषेधार्थ परिवर्तन मंडळाच्या वतीने विरोधी संचालकांनी सोसायटीच्या प्रवेशद्वारात निदर्शने केली. या आंदोलनात विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, अंबादास राजळे, दिलीप बोठे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष कडलग, भाऊसाहेब जिवडे, मारुती लांडगे, नंदकुमार शितोळे, सुनिल दानवे आदी सहभागी झाले होते.

माध्यमिक शिक्षक सोसायटीची निवडणुक नुकतीच झाली. निकालाच्या दिवशी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक असलेल्या व्यक्तीच्या भावाने सुनिल काकडे यांना शिवीगाळ करीत धमकावले. या प्रकरणाचा निषेध म्हणून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदाच्या निवडीच्या पहिल्या सभेच्या दिवशी निदर्शने करण्यात आली. विरोध, आरोप, प्रत्यारोप राजकारणात चालू असतात. मात्र शिवीगाळ करुन धमकावणे ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असून, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले. बाबासाहेब बोडखे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.