मूळा धरणाचे पाणी मिळण्यासाठी पाथर्डीत धरणे आंदोलन

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

मूळा धरणाचे पाणी शेवगाव व पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागाला द्या, या मागणीसाठी बुधवारी जलक्रांती जनआंदोलन समितीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. बुधवारी सकाळी नाईक चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यामध्ये मुख्य संयोजक दत्ता बडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, आपचे किसन आव्हाड, राहुल कारखेले, सतीश पालवे, बाबासाहेब वाघ, संजय दौड, भागवत पाखरे, गणेश वाघ, शेषराव दहिफळे, जनार्धन दौंड,सतीश दौंड, अशोक गलथरसह शेकडो युवक सहभागी झाले होते.

पाणी नाही तर मत नाही, देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिल्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारातच धरणे आंदोलन सुरु करण्यात आले. आंदोलकांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना अमोल गर्जे म्हणाले की, आमदारांच्या घरात गेल्या वीस वर्षांपासून सत्ता आहे. मात्र, एकदाही तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी मिळावे यासाठी राजळे यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याला ऊसतोड मजूर पाहिजे म्हणून आमदार राजळे तालुक्याच्या पूर्व भागाला मुळेचे पाणी देत नसल्याचा आरोप गर्जे यांनी केला. यावेळी दत्ता बडे म्हणाले की, मूळा धरणाचे पाणी तालुक्यातील साकेगावपर्यंत आले. मात्र, पुढे का आणले गेले नाही. आम्ही तुम्हाला मते दिली. आमची मते तुम्हाला चालतात मग आम्हाला पाण्यापासून का वंचित ठेवत आहात. चालू अधिवेशनात या विषयावर आमदार मोनिका राजळे यांनी आवाज उठवावा, अन्यथा येत्या विधानसभेला तुम्हाला मत देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. सायंकाळी उशिरा धरणे आंदोलन विसर्जित करण्यात आले.