अग्निवीरांना शासकीय-निमशासकीय सेवेत संधी? उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना

NOTIFICATION FOR AGNIVEER RECRUITMENT FOR YEAR 2025-26 BY ARMY RECRUITING OFFICE MUMBAI

केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना राज्याच्या शासकीय-निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. सैन्यदलातील अग्निवीर म्हणून असलेली सेवा समाप्त झाल्यानंतर त्यांना शासकीय, निमशासकीय सेवेत सामावून घेण्याच्या उद्देशाने उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारने एका अभ्यासगटाची स्थापना केली आहे.

पुणे येथील सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल दीपक  ठोंगे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अभ्यासगटाला  अभ्यास करून शिफारशींसह तीन महिन्यांत अहवाल देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

अग्निवीर योजनेमुळे तरुणांना चार वर्षे भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी मिळत असली तरी त्यांच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुढील रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातून या भरती योजनेतंर्गत पहिल्या तुकडीत 2 हजार 839 अग्निवारांनी सहभाग घेतला होता. या अग्निवारांना या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये चार वर्षे पूर्ण होत आहेत. या योजनेनुसार अग्निवीरांमधील 25 टक्के अग्निवीरांची सेवा पुढे नियमित होईल, मात्र उर्वरित 75 टक्के अग्निवीरांचा राज्याच्या पोलीस, वन विभाग, अग्निशमन दल, राज्य राखीव पोलीस दल यासारख्या शासकीय सेवांमध्ये समावेश करून घेतल्यास त्यांच्या कौशल्य आणि प्रशिक्षणाचा सरकारला उपयोग होईल या उद्देशाने हा अभ्यासगट नेमण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

z या अभ्यासगटात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे, छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सईदा फिरासत, निवृत्त ले. जनरल आर.आर. निंभोरकर, निवृत्त  एअर मार्शल नितीन शंकर वैद्य, निवृत्त रिअर ऍडमिरल आशिष कुलकर्णी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे, तर पुण्याचे सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक निवृत्त ले. कमांडर ओंकार कापले हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.