विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन माणसांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती! राहुल गांधींपाठोपाठ शरद पवार यांचा गौप्यस्फोट

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून कशी मतचोरी केली याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी भंडाफोड केला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी दिल्लीत दोन व्यक्ती आपल्याकडे आल्या होत्या. त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती, असा गौप्यस्फोट आज केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडल यात्रेला नागपूर येथून सुरुवात झाली. ही यात्रा पुढील 40 दिवस राज्यातील विविध भागांतून जाणार आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत मतचोरीच्या मुद्दय़ावर राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. तसेच निवडणुकीत होणाऱया हेराफेरीबाबत मोठा दावा केला.

शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दोन लोक दिल्लीत माझ्याकडे आले होते. त्या दोन जणांची नावे व पत्ते आता माझ्याकडे नाहीत. त्यांनी मला सांगितले, महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहेत. आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो; पण त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. असे लोक भेटतच असतात. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली. त्या लोकांनी आपले म्हणणे त्यांच्यापुढे मांडले. त्यावेळी या कामात आपण भाग घेऊ नये. हा आपला रस्ता नाही. आपण जनतेच्या दरबारात जाऊ, अशी भूमिका आम्ही घेतली, असे शरद पवार म्हणाले.

राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागणे चुकीचे

राहुल गांधी यांनी सखोल अभ्यास करून निवडणूक यादीतील घोळाविषयी मुद्दे मांडले आहेत. एका घरात 40 लोकांनी मतदान केल्याचे पुराव्यानिशी मांडले. अशी अनेक उदाहरण त्यांनी दिली, नुसती उदाहरणे नाही, तर त्यासाठी आधारही दिला. निवडणूक आयोगानेही त्यात लक्ष घालण्याचे ठरवलेले दिसते, पण हे करत असताना राहुल गांधी यांना चर्चेसाठी बोलावले. पण त्यासाठी शपथपत्राची अट घातली हे चुकीचे आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. राहुल यांनी सांगितलं, त्यांनी संसदेत आधीच शपथ घेतली आहे. त्यामुळे वेगळी शपथ घेण्याची गरज नाही. हा आग्रह निवडणूक आयोग करतं हे योग्य नाही. राहुल गांधी यांनी जे प्रात्यक्षिक दिलं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले.

कोण कुठे बसलं यावरून राजकारण करणं दुर्दैवी

राहुल गांधी यांनी जे प्रात्यक्षिक दिल्लीत दिले त्यावेळी माझ्यासोबत उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे कुठे बसले होते यावरून राजकारण सुरू आहे. प्रेझेंटेशन पाहायचं म्हटलं की आपण पहिल्या रांगेत कधी बसत नाही. जसं आपण एखादा चित्रपट पाहायला गेलो तर पहिल्या रांगेत बसत नाही. आपण पाठीमागे बसतो. त्याच पद्धतीने मी स्वतःदेखील शेवटी बसलो होतो. मात्र उद्धव ठाकरे कुठे बसले याचं दुर्दैवाने राजकारण करण्यात येत आहे, असं शरद पवार म्हणाले.

पालिका निवडणुकांबाबत आघाडीत अद्याप चर्चा नाही

पालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या मुद्दय़ावर महाविकास आघाडीची भूमिका काय याबाबत शरद पवार म्हणाले, पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आमची चर्चा झालेली नाही. त्याबाबत इतर पक्षांनी काही मतं मांडली असतील तर त्याबाबत मी भाष्य करू इच्छित नाही. या मुद्दय़ावर आम्ही एकत्र बसून एकवाक्यता करता येईल का हे पाहू, असे शरद पवार म्हणाले.

टॅरिफच्या मुद्दय़ावर सर्वांनी सरकारला पाठिंबा द्यावा

अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफच्या मुद्दय़ावर राष्ट्रीय हित लक्षात ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. ट्रम्प कसे काम करतात हे आपण त्यांच्या पहिल्या कार्यकाळात पाहिले आहे. मला वाटते की, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. ते विचार न करता जे मनात येते ते बोलतात, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

शेजारी देशांशी मजबूत मैत्री करणे गरजेचे

आपण आपल्या शेजारील देशांबद्दलच्या धोरणाकडे दुर्लक्ष करू नये. आज पाकिस्तान आपल्याविरोधात आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवसारखे देशही आपल्यावर खूश नाहीत. आपले शेजारी देश आपल्यापासून दूर जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे संकेत गांभीर्याने घ्यावेत आणि शेजारील देशांशी मैत्री मजबूत करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे शरद पवार म्हणाले.

सरकारकडून ईडीचा गैरवापर

सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या कारवायांबाबत जे मत व्यक्त केले आणि जी काही माहिती दिली आहे त्यावरून हे सरकार ईडीचा जाणीवपूर्वक गैरवापर करत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे शरद पवार म्हणाले.

मतचोरीचं सत्य पुढे यायला पाहिजे

राहुल गांधी यांचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत म्हणून आम्ही स्वस्थ बसणार नाही. याचा निकाल त्यांना द्यावाच लागेल. आमची माहिती चुकीची असेल तर त्यांनी देशाला हे सांगितले पाहिजे. आणि नसेल तर सत्य पुढे यायला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

संसदीय लोकशाहीबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन ‘दूध का दूध पानी का पानी’ झालं पाहिजे.

उत्तर भाजपकडून नको

मुख्यमंत्र्यांच्या बाबत कुणी आक्षेप घेतलेला नाही. निवडणूक आयोगाबाबत आक्षेप असताना भाजप व मुख्यमंत्री उत्तर देण्यासाठी ताकदीनिशी पुढे का येत आहेत समजत नाही. आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं आहे. भाजपकडून नको, असे शरद पवार म्हणाले.