Ahilyanagar News – दर्शन घेऊन परतत असताना भाविकांवर काळाचा घाला; रिक्षा आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

शनी शिंगणापूर येथून दर्शन घेऊन माघारी चाललेल्या घोटी इगतपुरी (नाशिक) येथील भाविकांची रिक्षा व शिर्डी येथून भाविकांना शिंगणापूर येथे घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या भयंकर अपघातात रिक्षामधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर टेम्पो ट्रॅव्हलरमधील 9 भाविक जखमी झाले आहेत.

राहुरी शिंगणापूर रोडवरील उंबरे परिसरातील तांबे पेट्रोल पंपाजवळ. मंगळवार (6 जानेवारी 2026) सायंकाळच्या वेळेत भीषण अपघाताची ही घटना घडली. घोटी इगतपुरी (नाशिक) येथील भाविकांना घेऊन जाणारी रिक्षामधील भाविक शिंगणापूर येथून दर्शन घेऊन राहुरी मार्गे नाशिक दिशेला जात होते. उंबरे तालुका राहुरी हद्दीत शिंगणापूर दिशेला भाविकांना घेऊन जाणाऱ्या शिर्डी येथील टेम्पो ट्रॅव्हलर समोरासमोर धडकल्याने रिक्षामधील चारजण जागीच ठार झाले.

अपघाताच्या घटनेत रिक्षाचा चक्काचूर झाला तर टेम्पो ट्रॅव्हलर पलटी होऊन दूर अंतरावर फेकला गेल्याने ट्रॅव्हलर मधील अनेक भाविक जखमी झाले.अपघाताची घटना घडताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ हलविण्यास मदतकार्य केले. राहुरी येथील पाच रुग्णवाहिका चालकांनी आपल्या रुग्णवाहिका घेऊन तातडीने घटनास्थळी हजर झाले. अपघातातील जखमींना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तीन तरुणांना मृत घोषित केले. तर जखमी झालेल्या ९ जणांना उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले.

राहुरी शिंगणापूर रोडवरील उंबरे हद्दीत रिक्षा व टेम्पो ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात चारजण ठार झाले आहेत, अशी माहिती स्थानिग नागरिक राजेंद्र वाडेकर यांनी दिली.