
कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरात सोमवारी (06-10-2025) मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात दोन गाभण शेळ्या व दोन बोकड ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना सहाचारी शिवारातील जाधव वस्ती येथे घडली. गौतम बँकेचे माजी उपाध्यक्ष लालूमामा शेख यांच्या वस्तीवरील गोठ्यात रात्री सुमारे 1 ते 4 च्या दरम्यान बिबट्याने जाळीवरून उडी मारून आत प्रवेश केला. बंदिस्त असलेल्या शेळ्या व बोकडांवर त्याने हल्ला चढवत दोन गाभण शेळ्या व एक बोकड ठार केले. तर एका बोकड्याचे मुंडके शरीरापासून वेगळे केलेल्या अवस्थेत आढळले. सकाळी नेहमीप्रमाणे चारा टाकण्यासाठी गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यांनी तात्काळ याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागातील श्रद्धा पडवळ यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून परिस्थितीची पाहणी करण्यात आली. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप दहे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले.
घटनास्थळाची पाहणी करताना या भागात एकापेक्षा अधिक बिबट्यांची हालचाल असल्याचे संकेत मिळाले आहेत. ग्रामस्थांनी वनविभागाकडे त्वरित पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. या परिसरात लोकसंख्या तसेच शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाकडून पुढील आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.