
राहाता तालुक्यात बिबट्याची दहशत कायम असतानाच, आता सिंह दिसल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. बिबट्याने अनेक प्राण्यांचे बळी घेतले असून, नागरिकांवरही हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता राहाता शहरातील सदाफळ वस्तीवर सिंह दिसल्याने दुहेरी दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. त्यामुळे वन विभागाने येथे तातडीने पिंजरा लावून सिंहाला जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राहाता तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बिबटे धुमाकूळ घालत आहेत. बिबटे दररोज कुठे ना कुठे पशुधनावर हल्ला करून त्यांची शिकार करत आहेत. तसेच, नागरिकांवरील हल्ल्याच्याही घटना घडतच आहे. तर, अनेक चिमुकल्यांनाही बिबट्याने आपले शिकार बनवले आहे. त्यातच आता सिंहाची भर पडल्याने सारेच धास्तावले आहेत.
राहाता शहरातील सदाफळ वस्ती, मावलाया रोड या भागात एका रस्त्यावर बसलेला सिंह काही मजुरांना दिसून आला. त्यांनी तो प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. मात्र, खरंच तो सिंह आहे का, याची वन विभागाने पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, सिंह या भागात आला कुठून आणि कसा, असा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे वन विभागाने याची सत्यता पडताळावी. त्यानंतरच याबाबतची सत्यता समोर येईल. मात्र, इथे सिंह आल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.