अहिल्यानगरमध्ये महायुतीत खडाजंगी!

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांत जागावाटपावरून राजकारण रंगू लागले आहे. शिंदे गटाला बरोबर घ्यायचे की नाही, यावरून खडाजंगी सुरू आहे. यातून शिंदे गटाचे म्होरके अडचणीत आले आहेत.

अहिल्यानगरात शिंदे गटाकडे काही दिग्गज नगरसेवक आहेत. हे नगरसेवक पुढे विधानसभा निवडणुकीतही उतरू शकतात. ही बाब लक्षात घेता, आमदार संग्राम जगताप यांचा गट मिंधे गटाला बरोबर महायुतीत घेत निवडणूक लढू पाहत आहे. मात्र, दीड वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटात असलेल्या काही माजी नगरसेवकांनी माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात काम केले होते. त्यामुळे विखेंकडून शिंदे गटातील त्या माजी नगरसेवकांना विरोध होत आहे. शिंदे गटाला केवळ नऊ जागा देण्यास भाजपमधील विखे तयार आहेत. मात्र, शिंदे गटाला 23 जागा हव्या आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आज (दि.28) रात्री एक बैठक झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही.