Ahilyanagar News – पाथर्डीत पावसाची विश्रांती, मोहटादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पावसाने उघडीप देताच मोहटा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी दोन दिवसात मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. घटस्थापनेच्या दिवशी देवीगडाकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने व कारेगाव येथील नदीवरील पूल वाहून गेला. यामुळे भाविकांनी नवरात्र उत्सव काळात देवीच्या दर्शनाला येण्याचे टाळल्याने अपेक्षित गर्दी सुरवातीच्या काळात गडावर जमली नाही. परिणामी अनेक व्यावसायिकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. तसेच परिवहन मंडळाला सुद्धा या गोष्टीचा फटका बसला.

रविवारी (28 सप्टेंबर) सकाळी पावसाने उसंत घेतल्याने दोन दिवसांपासून गडावर गर्दी होण्यास सुरवात झाली. सध्या गडावर घटी बसणाऱ्या महिला व खडा पहारा देणाऱ्या भाविकांची चांगली गर्दी असून गडाच्या मार्गावर अनेक स्वयंसेवी संस्था,लोकप्रतिनिधी यांनी भाविकांच्या फराळ,नाश्ता,चहा,पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या शिवाय देवीगडाच्या पायथ्याला असलेल्या नारळ, फुले, प्रसाद, खेळणी, मिठाई, हॉटेल या विक्रेत्यांच्या दुकानातही ग्राहकांची गर्दी आता दिसून येत आहे. रविवारची सुट्टी अन् सातवी माळ हा योग जुळून आल्याने मोठी गर्दी गडावर पाहायला मिळाली. मोहटा देवस्थानच्या वतीने मोफत अन्नदान होत असल्याने भाविकही महाप्रसादाचा लाभ घेऊनच गड सोडत होते. सकाळी व सायंकाळी होणाऱ्या आरतीच्या वेळेसही मोठी गर्दी होती. नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटा देवीची सर्वदूर प्रचिती असून नवरात्र उत्सव काळात अनेक भाविक नवस फेडण्यासाठी आवर्जून येत असल्याने सध्या गडावर मोठी गर्दी जमा झाली असल्याचे दिसून येत आहे.