
सामना प्रतिनिधी । अहमदपूर
मराठवाड्यात अल्प पावसामुळे पाण्याच्या पातळीत घट झाली असून त्याचा थेट परिणाम मिरची उत्पादनावर झाला आहे. मिरची उत्पादन घ्यायला मुबलक पाणीच उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. यामुळे मिरचीचे भाव वाढले आहेत. गुंटूर, तेजा, कश्मीरी या प्रकारच्या मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत. हैद्राबाद, गुंटूर या ठिकाणाहून स्थानिक व्यापारी मिरची खरेदी करून मार्केट मध्ये मिरची विक्री करत आहेत. या वर्षी भाव वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.
मिरची उत्पादनात घट झाल्याने मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिरचीचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत किलोमागे 30 रुपयांनी वाढले आहेत. तर खोबऱ्याचे दर 200 रुपयांहून 300 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. अगोदरच लाल मिरचीचे दर हे ठोक प्रतिक्विंटल 9000 रुपये होते आता 1100 रुपये क्विंटल ला पोहचले आहेत. गेल्यावर्षी बऱ्यापैकी उत्पादन निघाले होते. पण यावर्षी मात्र अल्प पाऊस व दुष्काळ सदृष्य परिस्थीतीमुळे मिरचीचे उत्पादनात घट झाली. त्यामुळे दर वाढलेले आहेत असे व्यापारी सांगत आहेत.
पावसाळ्याचे चार महिने पुरतील इतक्या मसाल्याची गृहिणी व्यवस्था करून ठेवतात. सध्या बाजारात तयार मसालेही मिळतात मात्र यात भेसळ होत असल्याने अनेक गृहिणीचा कल स्वतः मसाले बनवण्याकडे असतो. जेवणाची चव वाढवण्यासाठी गृहिणीचा कल हा गावरान मिरची घेण्याकडे आहे. पण सर्व मसाल्याचे भाव स्थिर असले तरी मिरची व खोबऱ्याचे भाव वाढले आहेत.

































































