Air India Plane Crash Case – बोईंग 787 विमानातील तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना, अमेरिकेतील संस्थेचा दावा

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय 171 (AI 171) या विमानाला 12 जून 2025 रोजी झालेल्या भीषण अपघाताबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील ‘फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी’ (FAS) या एव्हिएशन सेफ्टी कॅम्पेन ग्रुपने सादर केलेल्या अहवालात या अपघातासाठी विमानातील गंभीर तांत्रिक चुका कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. हे विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळले होते. यामध्ये प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह एकूण 270 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला अनेक महिने उलटून गेल्यानंतरही नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र, आता FAS च्या अहवालाने खळबळ उडवून दिली आहे.

FAS ने 12 जानेवारी 2026 रोजी अमेरिकन काँग्रेसला सादर केलेल्या अहवालानुसार, संबंधित बोईंग 787 विमानात ते एअर इंडियाच्या ताफ्यात सामील झाल्यापासूनच अनेक तांत्रिक समस्या होत्या. या विमानामध्ये अभियांत्रिकी, गुणवत्ता नियंत्रण आणि देखभालीच्या बाबतीत मोठ्या उणिवा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे, विमानाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअरमध्ये दोष होते. याशिवाय सर्किट ब्रेकर वारंवार ट्रिप होणे, वायरिंगमध्ये दोष असणे, शॉर्ट सर्किट, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि विद्युत प्रणाली अतिउष्ण होणे अशा अनेक तक्रारींची नोंद आधीच करण्यात आली होती.

या गंभीर दाव्यांवर बोईंग कंपनीने आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. बोईंगच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, कंपनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) सर्व नियमांचे आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करते. हिंदुस्थानातील विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या प्रकरणाचा तपास करत असून, त्यांच्या अंतिम निर्णयाचे आम्ही पालन करू, असेही कंपनीने म्हटले आहे. दुसरीकडे, एअर इंडियाने अद्याप या अहवालावर कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही.