स्वयंपाकघरात सापडला सांगाडा; एक वर्षानंतर पोलिसांनी केला हत्येचा उलगडा

गुजरातमधील अहमदाबाद येथील पोलिसांनी एका वर्षापूर्वीच्या झालेल्या हत्याकांडचा खुलासा केला आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकर आणि मित्रांच्या मदतीने आपल्या नवऱ्याची निर्घृण हत्या केली होती. यानंतर सिनेस्टाईल पद्धतीने मृतदेह लपवण्यात आला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान तब्बल एका वर्षानंतर या हत्येचा खुलासा झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?
अहमदाबाद शहरातील रहिवासी समीर अन्सारी (35) गेल्या वर्षी 2024 मध्ये अचानक बेपत्ता झाला. एक वर्ष त्याचा शोध सुरू होता, पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. समीर आणि त्याची पत्नी रुबी यांच्यात अनेक वेळा खटके उडायचे. दरम्यान, रुबीचे रुबी इम्रान नावाच्या एका व्यक्तीसोबत अवैध संबंध होते. त्यामुळेच या दाम्पत्यामध्ये सतत वाद होत होते.या वादाचे रुपांतर हत्येत झाले.

तीन महिन्यांपूर्वी जेव्हा हे प्रकरण गुन्हे शाखेकडे पोहोचले तेव्हा पोलिसांना समीरच्या हत्येचा संशय आला. त्यामुळे त्यांनी चौकशी सुरू केली. समीरचा मोबाईल फोन 14 महिन्यांपासून बंद होता. त्याने कोणत्याही मित्रांशी किंवा नातेवाईकांशी संपर्क साधला नव्हता. सुगाव्यांच्या आधारे पोलिसांनी इम्रानचा शोध घेतला. त्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासा झाला. चित्रपटाप्रमाणेच, पत्नी रूबीने तिच्या प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांसह प्रथम तिचा पती समीरची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह लपवला.

या हत्येची योजना विचार आखण्यात आली होती. त्यामुळे एक वर्ष उलटूनही पोलिसांना हत्येचा कोणताही सुगावा लागला नाही. पोलिसांना रुबीवर संशय होता, परंतु तिच्या कृत्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. रुबीने तिच्या पतीची हत्या केली आणि तिच्या प्रियकर आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर तिने मृतदेह तिच्या घराच्या स्वयंपाकघरातील जमिनीखाली पुरला आणि नंतर त्यावर टाइल्स बसवल्या. तिच्या प्रियकराच्या कबुलीनंतर, अहमदाबाद गुन्हे शाखेला घरातून सांगाड्याचे अवशेष सापडले.

पोलीस चौकशीदरम्यान, आरोपी इम्रानने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, रुबीने हत्येची योजना आखली होती. त्यांनी प्रथम समीरला बांधले, नंतर त्याला चाकूने भोसकून मारले. एवढेच नाहीतर त्यांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि त्याचे अवशेष स्वयंपाकघरातील जमिनीखाली पुरले. या प्रकरणात अद्याप फरार असलेल्या उर्वरित आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.