…तरीही वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्येच, टी-20 वर्ल्ड कपसाठी सात मैदानांची निवड 

मुंबईत जेव्हा जेव्हा वर्ल्ड कपची फायनल झालीय, जगज्जेतेपद हिंदुस्थाननेच पटकावले आहे. मग तो 2011 चा आयसीसी वर्ल्ड कप असो किंवा रविवारी झालेली महिला वर्ल्ड कपची फायनल. मुंबई हे हिंदुस्थानी क्रिकेटसाठी लकी असूनही आगामी टी-20 वर्ल्ड कपची फायनल अहमदाबादला खेळविली जाणार असल्याचे आयसीसीने निश्चित केले आहे. फक्त पाकिस्तानचा संघ फायनलला पोहोचला तर मात्र अहमदाबादचा सामना कोलंबोला खेळविला जाईल.

आयसीसीने आगामी वर्षी होणाऱया टी-20 विश्वचषकासाठी हिंदुस्थानातील पाच प्रमुख मैदानांची निवड केली आहे. यात अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या शहरातील मैदानांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय श्रीलंकेतील दोन स्थळांचीही निवड करण्यात आली आहे. वर्ल्ड कपच्या अंतिम स्थळांबाबत अधिपृत घोषणा लवकरच होणार असली तरी सूत्रांच्या माहितीनुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे, मात्र पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पात्र ठरल्यास कोलंबो हे बॅकअप स्थळ म्हणून ठेवले जाणार आहे.

अहमदाबादमध्ये 2023 मध्येही वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळविला गेला होता आणि पूर्ण स्पर्धेत अपराजित असलेला हिंदुस्थानी संघ थेट फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरला. तेव्हाही जगज्जेतेपदाची लढत मुंबईत खेळविण्यासाठी सारे आग्रही होती, पण तसे केले गेले नाही आणि हिंदुस्थानी संघ हरला. 1983 नंतर हिंदुस्थानचा संघ तब्बल 28 वर्षांनी जगज्जेता ठरला होता. त्याआधी 1996 साली फायनल लाहोरला खेळविली गेली होती आणि उपांत्य सामना कोलकात्यात. या सामन्यात हिंदुस्थान हरला होता. 2011 मध्ये फायनल मुंबईत निश्चित करण्यात आली आणि हिंदुस्थानने जगज्जेतेपद पुन्हा काबीज केले. मात्र 2023 मध्ये फायनल अहमदाबादला खेळविली गेली आणि निकाल तोच लागला. हिंदुस्थान पराभूत. आताही महिलांची वर्ल्ड कपची फायनल नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविली गेली आणि 52 वर्षांत हिंदुस्थानी महिलांनी इतिहास रचला.