
अहमदाबादमध्ये वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विना हेलमेट दुचाकी चालवल्याने ट्रॅफिक पोलिसांनी तरुणाला तब्बल 10 लाख 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ई-चलन रद्द करण्यासाठी तरुण गेल्या 11 महिन्यांपासून ट्रॅफिक पोलीस कार्यालय आणि कोर्टात खेटा मारत आहे.
अनिल हा तरुण कायद्याचा विद्यार्थी असून उदरनिर्वाहासाठी तो पान टपरी चालवतो. 11 एप्रिल 2024 रोजी तो आपल्या अॅक्टिव्हावरून दुकानातील सामान आणण्यासाठी गेला होता. सामान घेऊन येत असताना त्याला ट्रॅफिक पोलिसांनी रोखले आणि त्याचे लायसन्स तपासले. लायसन्स तपासून पोलिसांनी त्याला सोडून दिले.
अनिल दुकानावर पोहचताच त्याला 500 रुपयांचा चलनचा मॅसेज आला. अनिलने पोलिसांशी संपर्क करुन चलानबाबत विचारले, तसेच त्याचक्षणी दंड भरला असता असे सांगितले. पोलिसांनी चलान घ्यायला नकार देत ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. ऑनलाईन चलन तपासले असता 10,00,500 रुपये रक्कम दाखवली. यानंतर अनिलला धक्काच बसला.
हे चलान रद्द करण्यासाठी अनिल पोलीस कमिश्नर आणि ई-चलान विभागाकडे पाठपुरावा केला. पोलिसांनी नियमांचे कारण पुढे करत ईमेल करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तरुणाने ईमेलही केला. मात्र चलान रद्द झाले नाही. अखेर त्याने मिर्झापूर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र न्यायालयाने पोलिसांशी संपर्क करण्यास सांगितले.




























































