नगर शहरातील रस्त्यांवर बेशिस्तीचा पाढा, 20 मीटरचा रस्ता दिवसा होतो 5 मीटरचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील रस्ते 20 मीटरचे असले तरी काही ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाल्याने रस्ते पाच फूटदेखील राहिलेले नाहीत. तर, काही ठिकाणी अस्ताव्यस्त अथवा पार्ंकगअभावी रस्ते दिवसेंदिवस बारीक होऊ लागले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी वारंवार अडथळा निर्माण होत आहे. शहरातील नागरिकांना रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, शिस्तीची सवय नसल्याने आणि वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने वाहतूककोंडी ही नित्याची बाब ठरत आहे. स्टेशन रोडची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी हा रस्ता चांगला करण्यात आल्याने या ठिकाणची वाहतूककोंडी टळली आहे.

नगर शहरातील वाहतूक आता पुण्याच्या धर्तीवर सुरू करण्याची वेळ आली आहे. शहरामधील काही ठिकाणी पे पार्किंग होत असून, त्याकडेदेखील महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. नेमके या पे पार्ंकगचा ठेका दिला आहे की, मनमानी कारभार आहे याचाही सुगावा लावणे गरजेचे आहे. कापडबाजार, दिल्लीगेट, चितळे रोड, माळीवाडा बसस्थानक, मार्केटयार्ड, कोर्ट रोड आदी ठिकाणी 20 फुटांच्या रस्त्याला विविध वाहने पार्ंकग केल्याने येथे अवघा 5 फुटांचादेखील रस्ता राहत नाही.

महामार्गावरील रस्ते दिवसा होतात अरुंद!

शहरामधून राज्य महामार्ग जात आहेत, या महामार्गावर विविध ठिकाणी हॉटेल आणि इतर व्यावसायिक असल्याने या ठिकाणी रस्ते अतिशय अरुंद होत आहेत. दिवसा या ठिकाणावरून जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा रस्त्यावरून जाता-येता अपघात होत असल्याने शहरातून जाणाऱया महामार्गावरील व्यावसायिकांना मनपा प्रशासनाने आणि वाहतूक पोलिसांनी समज देणे गरजेचे आहे.

उपनगरात वाहनांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ!

नगर शहर आता वाढत चालले आहे. विविध सुविधा पुरवण्यासाठी जसे मनपाला आणि इतर विभागाला कष्ट पडत आहे, तसेच कष्ट आता वाहतूक शाखेने घ्यावेत आणि शहरातून जाणाऱया राज्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहाण्यासाठी शहरातून जाणाऱया महामार्गावरील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्ंकग किती प्रमाणात करावी, यासाठी पार्किंग रेषा आखण्याची गरज व्यक्त केली जात आहे.