
नगर शहरातील निकृष्ट रस्त्यांचा भंडाफोड शहर काँग्रेसकडून सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री शहर काँग्रेसकडून शहराच्या मध्यभागी असलेल्या बाजारपेठेतील रस्त्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर ‘भ्रष्टाचाऱयांना 70 टक्के, तर रस्त्याला 30 टक्के’ असे लिहिण्यात आले होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक संजय झिंजे, अभिनय गायकवाड, इंजिनीअर सुजित क्षेत्रे उपस्थित होते.
यावेळी काळे म्हणाले, रस्त्याच्या कामांत 70 टक्के कमिशन खाणे सुरू आहे. केवळ 30 टक्केच रक्कम प्रत्यक्षात रस्त्यावर खर्च केली जाते. भिंगारवाला चौक ते कोतवाली पोलीस स्टेशन ते जुन्या मनपाच्या चौकापर्यंत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी मनपाने सिमेंट काँक्रिटीकरण करत शनी चौक ते होशिंग हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता पूर्ण केला होता. मात्र, हा दिलासा औट घटकेचा ठरला असून, रस्ता गायब झाला आहे. येत्या पावसाळ्यात उरलेला रस्तादेखील पूर्ण वाहून जाईल. नगरकरांच्या तोंडाला भ्रष्टाचाऱयांकडून पाने पुसली जात असल्याचा घणाघात काळे यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसने निकृष्ट काम झालेल्या रस्त्यावरच लिहिलेले घोषवाक्य या रस्त्याने ये-जा करणारे नागरिक थांबून-थांबून वाचत आहेत. या अनोख्या आंदोलनाची शहरभर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते घोटाळा प्रकरण नगरकरांमध्ये चर्चेचा विषय झाले आहे.