नगर जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक, 11 महिन्यांत 344 जणांना लागण

680

नगर जिल्ह्यात यंदा जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान सर्वाधिक 344 जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाने दिली आहे. जुलैपासून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वाधिक 108 जणांना डेंग्यूची लागण ऑक्टोबर महिन्यात झाली होती. गेल्या वर्षी याच काळात अवघ्या 37 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते.

जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस झाला. यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढले असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नगर शहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले होते. या दोन महिन्यांत जिल्हाभरात 176 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे. याचा काळात कावीळ, चिकनगुनिया, टायफाईड, कॉलरा या साथरोगांचाही फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. जुलैपासून पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध ठिकाणी पावसाचे पाणी साठून डासांच्या संखेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. साथजन्य आजारांनी प्रत्येक घरात एकतरी पेशंट आढळून येत आहे. पेशी कमी होत असल्यानेही अनेक जण आजारी पडले आहेत. नगर शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये ताप व साथजन्य आजारांवर उपचार घेण्यासाठी दाखल होत आहेत. यात प्रामुख्याने डेंग्यू या आजाराचे प्रमाण असणारे रुग्ण जास्त प्रमाणावर आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूच्या नियंत्रणासाठी कराव्याच्या उपाययोजना याबाबत आदेश काढले असून त्यानुसार ग्रामीण धूर फवारणी व जनजागृती करण्यात आलेली आहे.

दरम्यान ही परिस्थिती एकट्या नगर जिल्ह्याची नसून राज्यभर डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र, गेल्या तीन आठवड्यापासून ही परिस्थिती नियंत्रणात आली आहे. असे असले तरी नागरिकांनी जागृत राहून डेंग्यूची लक्षण दिसल्यास, पेशी कमी झाल्यास शासकीय आरोग्य संस्थांमध्ये चाचणी करून उपचार करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी केली आहे.

महिनानिहाय डेंग्यू
जानेवारी-शून्य, फेब्रुवारी-1, मार्च-1, एप्रिल-शून्य, मे-2, जून-5, जुलै-19, ऑगस्ट-85, सप्टेंबर-55, ऑक्टोबर-108 आणि नोव्हेंबर-68 असे 334 रुग्ण असून याच सोबत 11 महिन्यांत 9 जणांना चिकनगुनियाची लागण झालेली आहे.

बचावासाठी उपाययोजना
पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गोळ्या वापराव्यात. शौचाला जाऊन आल्यास हात धुवावेत. जुलाब झाल्यास ओआरएस पाकिटे सरकारी दवाखान्यातून मोफत घ्यावीत. उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत. शिळे अन्नपदार्थ खाऊ नये. उघड्यावर शौचास बसू नये. अस्वच्छ व असुरक्षित पाणी पिऊ नये. मच्छरदाणी वापरावी. खिडक्यांना बारीक जाळी लावावी. वापरायच्या पाण्याच्या साठ्यात टेमिफॉस द्रावणाचे थेंब टाकावेत. मोठ्या पाणी साठ्यांमध्ये गप्पी मासे पाळावेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या