नगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये कडक लॉकडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील बहुतांश भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असतानाच नगर जिल्ह्यात मात्र सातत्याने पाचशेच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील 61 गावांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये उद्यापासून 13 ऑक्टोबरपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

नगर जिल्ह्यात दैनंदिन 500 ते 800 च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे 10 पेक्षा जास्त सक्रिय कोरोनाबाधित असणाऱ्या गावांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.

कोरोनाची लाट राज्यात ओसरत चाललेली असली तरी नगर जिल्ह्यात दोन-तीन तालुक्यात कोरोनाचे पेशंट वाढताना दिसत आहेत. त्यात संगमनेर तालुका आघाडीवर आहे. त्यामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात लॉकडाऊन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला होता. त्यानुसार संगमनेर तालुक्यातील 24 गावे लॉकडाऊन करण्यात आली असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. यासह अकोले तालुक्यातील 3 गावे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना या काळात बंद राहणार आहेत. तसेच, जीवनावश्यक वस्तूतील किराणा दुकाने सकाळी 8 ते 11 या वेळेत चालू राहणार आहेत.

श्रीगोंद्यातील लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी, श्रीरामपुरातील बेलापूर खु., उक्कलगाव, कारेगाव. राहात्यातील भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, कोऱहाळे, लोणी बु., लोणी खु., कोल्हार बु., पारनेरमधील वडनेर बु., कान्हूर पठार, गोरेगाव, दैठणे गुंजाळ, जामगाव, भाळवणी. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाण बु. तर पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि नेवासा तालुक्यातील कुकाणा गावात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

संगमनेरातील सर्वाधिक 24 गावे

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, पारेगाव बुद्रूक, पानोडी, शिबलापूर, बोटा, पिंपरणे, उंबरी, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगावपान, सायखिंडी तर अकोले तालुक्यातील लिंगदेव, वीरगाव, परखतपूर ही गावे लॉकडाऊन करण्यात आलेली आहेत.