
नगर शहरालगत अथवा नगरपरिषद, छावणी परिषदेच्या हद्दीत असणाऱया मात्र ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱया जिह्यातील 259 अंगणवाडय़ांचा आता थेट नागरी क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या अंगणवाडय़ांचे नियोजन, नियंत्रण हे संबंधित नगरपरिषद, नगरपालिका अथवा छावणी परिषदेच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी नागरीकरण होताना दिसत आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषद अथवा नगरपालिकांमध्ये होत आहे. काही ठिकाणी महानगरपालिकांची हद्द वाढत असून, शहरालगत असणाऱया गावांचा समावेश महापालिकांमध्ये होत आहे. यावेळी अन्य शासकीय यंत्रणा संबंधित नागरी यंत्रणेच्या ताब्यात जात आहेत. मात्र, नगरसह राज्यात अनेक ठिकाणी अंगणवाडय़ा ग्रामीण यंत्रणा म्हणजे जिल्हा परिषदेकडे राहत आहेत. अशा वेळी त्यांना निधी आणि सुविधा कशा पुरवाव्यात, असा प्रश्न जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागासमोर होता.
याशिवाय ग्रामीणपेक्षा नागरी भागातील अंगणवाडय़ांना अनुदान आणि अन्य सुविधा अधिक असल्याने नागरी भागात असणाऱया ग्रामीण यंत्रणेकडील अंगणवाडय़ा मनुष्यबळासह नागरी यंत्रणेकडे हस्तांतर करण्यात येत आहेत. नगर जिह्यात जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाचे 21 प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पातील सात प्रकल्पांतून ग्रामीण भागातील अंगणवाडय़ा या नागरी यंत्रणेकडे हस्तांतरित होणार आहेत. यात 259 अंगणवाडय़ांचा समावेश आहे.
जिह्यात नागरी भागात हस्तांतरण केल्यानंतर सात तालुक्यांत 1 हजार 893 अंगणवाडय़ा आणि मिनी अंगणवाडय़ा राहणार आहेत. यात भिंगार (ग्रामीण) 93, नेवासा 222, शेवगाव 277, कर्जत 356, जामखेड 228, पारनेर 392, अकोले 325 यांचा समावेश आहे. यांसह भिंगार छावणी क्षेत्रातील 3 बीट, नेवासा तालुक्यातील 1 बीट, शेवगाव तालुक्यातील 2 बीट आणि जामखेड 2 बीट हे कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. राज्याच्या महिला बालकल्याण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
हस्तांतरित होणाऱया अंगणवाडय़ा
भिंगार (ग्रामीण) 76, नेवासा 26, शेवगाव 48, कर्जत 25, जामखेड 47, पारनेर 49, अकोले 42 यांचा समावेश आहे.






























































