गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा, नगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हादंडाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून, त्यांच्या नियमानुसारच मंडप उभारण्यात यावेत. तसेच घरगुती आणि सार्वजनिक गणपतीच्या सजावटीत भपकेबाजपणा नसावा. सार्वजनिक मंडळातील श्री गणेशाची मूर्ती 4 फूट, तर घरगुती 2 फुटांची असावी. यावर्षी पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवरी आदी मूर्तींचे पूजन करावे. शाडू व पर्यावरणपूरक मूर्तीचे शक्यतो घरीच विसर्जन करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसेल तर जवळील कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे.

उत्सवासाठी स्वेच्छेने दिलेल्या वर्गणी व देणगींचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यास प्राधान्य द्यावे. कोरोना आणि साथजन्य आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेले निर्बंध कायम राहणार असून, गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. श्री गणेशाच्या दर्शनासाठी जास्तीत जास्त सोशल माध्यमांची व्यवस्था करावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. प्रत्यक्ष दर्शनासाठी येणाऱया भाविकांसाठी सामाजिक नियम पाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे.

‘श्रीं’च्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. चाळ व इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.