नगर जिल्ह्यात आंबा विक्रीच्या अडचणींत भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या आंबा विक्रीचा सीझन सुरू आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे आंबा विक्रीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून आठवडे बाजार बंद, 15 दिवसांपासून कडक लॉकडाऊन असल्याने व फळे, भाजीपाल्याची विक्री बंद असल्याने आंब्याच्या किरकोळ विक्रीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून आंब्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी खाली आले आहेत.

नगर जिह्यात साधारण 20 हजार हेक्टवर आंब्यांचे क्षेत्र आहे. त्यात बहुतांश केशर, हापूस आंब्यांचे क्षेत्र आहे. साधारण एप्रिल ते जून या कालावधीत आंब्याची विक्री होते. नगर जिह्यातील बहुतांश भागात शेतकरी व्यापाऱयांना ठोक विक्रीपेक्षा थेट विक्री करण्यावर भर असतो. आठवडा बाजार, तसेच शहरात जागोजागी आंबा अधिक विकला जातो. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्गातूनही हापूस आंबा आणून विक्री केली जाते. सध्या आंबा विक्रीचा सीझन सुरू आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून आठवडे बाजार बंद आहेत. 15 दिवसांपासून कडक लॉकडाऊन आहे.

प्रमुख शहरांत फळे, भाजीपाला विक्री बंद केलेली आहे. शेतकरी कंपन्या, शेतकरी गटामार्फत दुसऱया शहरांतही आंबा नेणे अवघड झाले आहे. या सर्व बाबींचा आंबा उत्पादक शेतकऱयांवर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी किरकोळ विक्री करता येत असली, तरी दरवर्षीच्या तुलनेत 60 टक्केच दर मिळत आहे. शेतकऱयांकडून विकल्या जाणाऱया आंब्याला दरवर्षीपेक्षा यंदा 40 टक्के दर कमी मिळत आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका सोसावा लागत असल्याचे दिसत आहे.

मी दरवर्षी काही प्रमाणात शेतातच किरकोळ व काही ठोकमध्ये आंब्यांची विक्री करतो. यंदा किरकोळ विक्री कोठे करायची? कोरोनामुळे किरकोळ विक्रीला अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यापाऱयांना ठोक दरातच विक्री केली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी दरात आंबा द्यावा लागल्याने आर्थिक फटकाही सोसावा लागला.

– सुभाष केदार, आंबा उत्पादक शेतकरी.

शेतकरी-ग्राहकांच्या दरांत मोठी तफावत

n आंब्याचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी शेतातून बाजारात आंब्याची थेट किरकोळ विक्री करतात. त्याचा शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होतो. यंदा मात्र शेतकऱयांना थेट ग्राहकांना विक्री करता येत नसल्याने व्यापाऱयांना ठोक विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱयांना मिळणाऱया रकमेत आणि ग्राहकांना खरेदी कराव्या लागत असलेल्या दरात किलोमागे तब्बल 50 ते 70 रुपयांची तफावत दिसून येत आहे. नगर जिह्यात बहुतांश भागांत केशर, हापूस आणि गावरान आंब्यांची लागवड आहे. शेतकऱयांना केशर आंब्याचे प्रतिकिलोला 40 ते 50 रुपये मिळतात. ग्राहकांना मात्र त्याच आंब्यासाठी 120 ते 140 रुपये प्रतिकिलोला मोजावे लागत आहेत.