
दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या नगर जिह्यावर गेल्या काही वर्षांपासून वरुणराजाने कृपादृष्टी दर्शविली आहे. गत चार वर्षांपासून तर पावसाने सरासरी गाठल्यामुळे शेतकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिह्यात यंदा सरासरीच्या 150 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिह्याची सरासरी भूजलपातळी एक मीटरने वाढली आहे. परिणामी यंदाही जिह्यात कमी टँकर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, अतिवृष्टीने मात्र पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अद्यापि शेतात पाणी असल्यामुळे रब्बी हंगामही उशिराने सुरू होणार आहे.
नगर जिह्यामध्ये 14 तालुके आहेत़ नगर दक्षिण भाग हा नेहमीच दुष्काळी भाग म्हणून राहिलेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात मात्र सर्वाधिक पाऊस याच पट्टय़ात झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेततळे भरून वाहू लागली आहेत, तर विहिरीसुद्धा काठोकाठ भरल्या आहेत. ओढे-नालेही वाहते आहेत. त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही. अतिवृष्टीमुळे सध्या तरी शेतामध्ये जाण्यासाठी वाट काढणे अवघड झाले आहे. चांगल्या पावसामुळे भूजल पातळीत यंदा वाढ होणार हे निश्चित होते.
जिल्हाभरात सरासरी 150 टक्के पाऊस झाला असून, भूजल पातळीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने मागील पाच वर्षांत ऑक्टोबर महिन्यात नोंदवलेल्या सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये घेतलेल्या नोंदीनुसार 14 तालुक्यांत 0.25 ते 2.61 मीटरपर्यंतची वाढ नोंदवली आहे. भूवैज्ञानिक कार्यालयाच्या यंत्रणेमार्फत जिह्यातील 202 विहिरींचे ऑक्टोबरमध्ये निरीक्षण करण्यात आले.
या निरीक्षणानुसार मागील पाच वर्षांतील सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत जामखेड, कोपरगाव, कर्जत, नगर तालुक्यात 1.30 मीटरपेक्षा अधिक, तर शेवगाव, पाथर्डी तालुक्यात 2 मीटरहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षी 2021 च्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये ही वाढ 0.73 ते 2.43 मीटरपर्यंतची झाल्याचे दिसून आले आहे.
भूजल साठय़ात झालेली वाढ ही आगामी रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच, जिह्यात उन्हाळ्यात टँकरसाठी उद्भवाची अडचण येणार नाही, असा अंदाज भूवैज्ञानिकांनी वर्तवला आहे.
एकीकडे जलसंधारणाची कामे झाली असतानाच शेततळ्यांचा विषयही महत्त्वाचा होता. जिह्यामध्ये दीड हजारहून अधिक शेततळ्यांना अनुदान देण्यात आले होते. पाऊस जास्त झाल्यामुळे विहिरींनाही पाणी मोठय़ा प्रमाणामध्ये आहे. नगर जिह्यामध्ये पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणामध्ये होत असला तरी भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.






























































