नगर शहरात 2 ठिकाणी ‘ईव्ही चार्जिंग स्टेशन’ होणार, महापालिकेकडून उभारणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाकडून राज्यभरात ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात आहे. या अंतर्गत नगर शहरात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम महापालिकेने हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरात प्रथमच इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू झाले आहे. महापालिका प्रशासनाच्या पुढाकारातून मुख्य कार्यालयाबाहेर व वसंत टेकडीजवळ दोन ठिकाणी या चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार आहे.

पर्यावरणपूरक ई-बाईकच्या वापरासाठी जनजागृती केली जात असून, त्याची सुरुवात मनपा कर्मचाऱ्यांना ई-बाईक खरेदीसाठी प्रोत्साहन देऊन करण्यात आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांचाही इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे मनपाने आता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. मनपा प्रशासन व विद्युत विभागाच्या प्रयत्नातून दोन ठिकाणी काम सुरू झाले आहे. टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम या कंपनीमार्फत हे स्टेशन चालविले जाणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून दर निश्चित केले जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. या दोन्ही ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या उभारणीचे काम गेल्या 2 दिवसांपासून सुरू झाले असून, लवकरच ते पूर्ण होऊन दोन्ही चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होतील, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे अभियंता जयेश कोके यांनी सांगितले.