नगरमध्ये पावसाची दमदार हजेरी, जिल्ह्यात 22 मिमी पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर नगर शहरासह जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी 22.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने नगर शहरातील काही भागात विजेचा खेळखंडोबा झाला होता. यंदा 7 जूनला जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर 11 जूनला जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. उर्वरित नक्षत्र मात्र कोरडेच गेले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

नगर शहर व परिसरात बुधवारी रात्री पुन्हा दमदार पाऊस झाला. सकाळपर्यंत पाऊस सुरू होता. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाने पाठ फिरविल्याने चिंतेचे वातावरण होते. आता पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा पाऊस खरीप पिकांना फायदेशीर ठरणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक 40.6 मिमी पाऊस पडला. सर्वांत कमी 7.2 मिमी पाऊस अकोले तालुक्यात पडला.

तालुकानिहाय पाऊस- नगर 33.8 मि.मी., पारनेर 24.7, श्रीगेंदा 40.6, कर्जत 16.6, जामखेड 8.3, शेवगाव 27.2, पाथर्डी 24.4, नेवासा 30.4, राहुरी 28.2, संगमनेर 8.2, अकोले 7.2, कोपरगाव 11.2, श्रीरामपूर 20.4, राहाता 16.1 मि.मी.

मुळा पाणलोटातही जोरदार हजेरी

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटानंतर आता मुळा पाणलोटातही काल बुधवारी पावसाने जोरदार सलामी दिली. कोतूळमध्ये अर्धा तास सरी कोसळत होत्या. पाणलोटातही पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेती कामांनी वेग घेतला आहे. भंडारदरा पाणलोटात झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू आहे. गत 24 तासांत भंडारदरात 20 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

कुकडी पाणलोटातही हजेरी

दक्षिण नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटात बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने या समूहातील धरणांमध्ये अल्प प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. पाऊस सुरू झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात दिलासा मिळाला आहे.