नगर – दरोडय़ाच्या तयारीतील टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमआयडीसी परिसरात दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या चारजणांच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. आरोपींच्या ताब्यातून 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.

राहुल अनिल काळे (वय 29, रा. गणेशनगर, ता. राहाता. सध्या रा. नायगाव खंडेवाडी, ता. पैठण), शुभम अनिल काळे (वय 24), भरत तात्याजी काळे (वय 24), विकास शेखर जाधव (वय 20, सर्व रा. गणेशनगर, ता. राहाता) अशी आरोपींची नावे आहेत. अक्षय यशवंत आव्हाड, आनंदा अनिल काळे (दोन्ही रा. गणेशनगर, ता. राहाता) हे फरार झाले आहेत.

आरोपी राहुल काळे हा व त्याचे साथीदार वडगाव गुप्ता शिवारातील एमआयडीसी ते शेंडी रस्त्यावर, रस्त्याने येणाऱया-जाणाऱया वाहनचालकांना अडवून लूटमार करून, दरोडा घालण्याच्या तयारीत रस्त्याच्या कडेला अंधारात बसलेले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे जाताच संशयित इसम पळून जाऊ लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करून चारजणांना ताब्यात घेतले. इतर दोनजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपींच्या अंगझडतीत एक तलवार, लाकडी दांडके, दोरी, मिरचीपूड, तीन मोबाईल असा एकूण 30 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेवरून सहायक पेलीस निरीक्षक दिनकर मुंडे, हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संतोष लोढे, सचिन आडबल, रविकिरण सोनटक्के, लक्ष्मण खोकले, भीमराज खर्से, कॉन्स्टेबल विनोद मासाळकर, जालिंदर माने, बबन बेरड यांच्या पथकाने ही कारवाई केली.