
गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या चर्चेत असणाऱ्या नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला मोठ्या प्रतीक्षेनंतर निधी मिळाला. मात्र, या राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून, यामुळे अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे वाहतूककोंडीमुळे या मार्गावरून प्रवास करणारे आता कासावीस होताना दिसत आहेत. नगर-देहरे यादरम्यानचा प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे.
नगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. या रस्त्याची साडेसाती काही केल्या संपत नव्हती. परिणामी, या मार्गावरील खड्ड्यांनी अनेक अपघातांत हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. स्थानिक नागरिकांसह साईभक्त आणि शनिभक्तांमधूनही या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती.
दरम्यान, नगर ते शिर्डी या 80 किलोमीटर मार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निधीतून नगर-बायपास ते शिर्डीदरम्यानच्या महामार्गाचे मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्याचे ई-टेंडर काढून त्याच्या कामाचेही वाटप झाले आहे. या कामामध्ये काही भागांत सिमेंट काँक्रीट, काही भागात नूतनीकरण, तर काही भागांत मजबुतीकरण केले जाणार आहे. पुण्याच्या ठेकेदार कंपनीने महामार्गाचे काम हाती घेतलेले आहे. 18 महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करण्याची लेखी सूचनाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरच या मार्गाचे काम पूर्ण होऊन या मार्गावरील खडतर प्रवास आता सुखरूप होईल, या अपेक्षेने नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला होता.
आठ महिन्यांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवातही झाली. मात्र, हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने विळद ते राहुरीदरम्यान अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी, जागोजागी वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. तसेच काही ठिकाणी छोटे-मोठे अपघातही सुरू आहेत. यात वाहनांचे नुकसान, तसेच अनेक नागरिक जखमी झाले आहेत. ठेकेदाराने कामांना गती देताना जेथे खोदकाम केले आहे, ते अगोदर पूर्ण करण्याऐवजी किंवा पर्यायी मार्ग खुला केलेला नाही. उलट जागोजागी खोदकाम करून वाहतुकीचा खेळखंडोबाच केला आहे.
अवजड वाहतुकीमुळे छोट्या वाहनचालकांची अडचण
रात्रीच्या वेळी विळद ते राहुरीदरम्यान जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी एकेरी वाहतूक, तर काही ठिकाणी नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. मध्येच रस्ता वळविण्यात आलेला आहे. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. शिवाय रात्रीच्या वेळी वेगात होणाऱ्या जड वाहतुकीमुळे दुचाकी अथवा छोट्या वाहनचालकांची मोठी अडचण होताना दिसत आहे.
गॅस पाइपलाइनचे काम बंद ठेवण्याची मागणी
नगरकडून हे काम केले जात असताना, राहुरी विद्यापीठाकडून गॅस पाइपलाइनचे कामही वेगात सुरू आहे. त्यांनीही रस्त्यावर खोदकाम केले आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी सुरू असल्याने प्रवाशांना राहुरी ते नगर प्रवास करताना मोठी डोकेदुखी सहन करावी लागते. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच महामार्गाचे काम संपेपर्यंत गॅस पाइपलाइनचे काम बंद ठेवावे, अशीही मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.




























































