कामात कुचराई केल्यास कारवाई, पालिका आयुक्तांना दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील कोरोनाला पुन्हा आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिलाने काम करायला हवे. यासाठी चार टीम तयार करण्यात येणार आहेत. या कामात कुचराई करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.

शहरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाहता महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आयुक्‍त मायकलवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. आयुक्‍त मायकलवार म्हणाले, शहरातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्‍न सोडविण्या बरोबरच नागरिकांच्या आरोग्य प्रश्‍नांनाही महत्त्व द्यायला हवे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मुकुंदनगरमध्ये महापालिकेने यशस्वीपणे कोरोना अटोक्‍यात आणला होता. त्या अनुभवांचा उपयोग आता होणार आहे. शहरात महापालिकेचे मोजकेच लोक काम करतात. महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची दृष्टी नकारात्मक आहे. महापालिकेकडे काम करण्यासाठी एकच टीम तयार आहे. सर्वांनी एक दिलाने काम करण्याची गरज आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच महापालिकेतील दैनंदिन काम करतानाच कोरोना विषयकही काम करावे.. भविष्यात नगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास काही परिसर हॉटस्पॉट करावे लागतील. त्यावेळी मुकुंदनगर प्रमाणे पूर्ण क्षमतेने काम करा. आजपासून महापालिकेची यंत्रणा कोरोनासाठी सज्ज करा. यंत्रणा कोलमडू नये यासाठी प्रयत्न करा. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी आरोग्य तपासण्या होतील, असे महापालिका आयुक्‍त मायकलवार यांनी सांगितले.