
सामना प्रतिनिधी । नगर
महापालिकेकडून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मागील आठवड्यात चार जणांवर कारवाई करण्यात आल्यानंतर आता बाजारपेठेतीलच आणखी तीन मोठ्या व्यावसायिकांवर मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे. माळीवाडा प्रभाग समिती समितीने आज केलेल्या कारवाईत दुकानांमधून तब्बल 200किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या असून, तिघांना 12 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आगामी काळामध्ये ही कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे
महापालिकेच्या पथकाने कापडबाजार व गंजबारातील मोठ्या दुकानदारांवर छापे मारुन झडती घेतली. यात द्वारकादास शामकुमार, लाईफस्टाईल, आनंद कुंकू या तीन मोठ्या दुकानदारांकडून तब्बल 200 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आल्याचे मुख्य स्वच्छता निरीक्षक अन्वर शेख यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वीच माळीवाडा कार्यालयाच्या पथकाने बाजारपेठेतील तीन प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांना 10 हजारांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर सोमवारी पुन्हा मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. मनपाकडून सुरू झालेल्या या छापासत्रामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, कारवाईची मोहीम अशाच पध्दतीने सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कचरा टाकणार्या 8 जणांना दंड!
प्लॅस्टिक जप्ती व कारवाईची मोहीम राबवितांनाच महापालिकेच्या पथकाने रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी कचरा व घाण टाकणार्यांवरही कारवाई सुरू केली आहे. भाजीविक्रेते, दुकानदारांसह मांस व मच्छी विक्रेत्यांवर मनपाने कारवाई केली असून, त्यांना प्रत्येकी 150 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महापालिकेच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे.

































































