
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने नेप्ती उपबाजारात होणारे कांदा लिलाव रोटेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असून शनिवारी (दि. 30) याची अंमलबजावणी करत पहिले रोटेशन पद्धतीने कांदा लिलाव पार पडले. पहिल्याच लिलावाला सुमारे 20 हजार गोण्यांची आवक झाली होती, तर या लिलावात गावरान कांद्याला 82 रुपये किलो व लाल कांद्याला 62 रुपये प्रतिकिलोचा उच्चांकी दर मिळाला.
यावेळी सभापती विलासराव शिंदे व उपसभापती रेवणनाथ चोभे, संचालक शिवाजी कारले, बाबासाहेब खर्से, बन्सी कराळे, कानिफनाथ कासार, रावसाहेब साठे, सचिव अभय भिसे, निरीक्षक संजय काळे, जयसिंग भोर, हिराबाबा पुरी आदी उपस्थित होते. कांदा लिलाव रोटेशन पद्धतीने करण्याबाबत अनेक दिवसापासून नगर बाजार समितीचे संचालक मंडळ विचार करत होते. यासाठी संचालक मंडळाने नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजार, राहुरी बाजार समितीला भेट देवून तेथील लिलाव पद्धतीची समक्ष पहाणी केली. त्यानंतर नगर बाजार समितीच्या नेप्ती येथील कांदा लिलावही रोटेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी बाजार समितीने हमाल, मापाडी, आडते, व्यापारी व कर्मचारी यांची बैठक घेवून विविध अडचणीवर चर्चा केली.
समितीच्या नेप्ती मार्केटमध्ये होणाऱ्या कांदा लिलावामध्ये सुसुत्रता आणणेसाठी चर्चा करण्यात आली. सध्या नेप्ती मार्केटमध्ये 103 आडते व्यवहार करत असून एकूण 117 मापाडी आहेत. सद्य परिस्थितीत आडत्यांच्या पद्धतीनेच लिलाव सुरू असून एकाच वेळी अनेक ठिकाणी आडते लिलाव चालू करतात. त्यामुळे खरेदीदाराला प्रत्येक ठिकाणी लिलावास उपस्थित राहाता येत नाही. यामुळे कांदा लिलाव रोटेशन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार शनिवार दि. 30 नोव्हेंबरपासून नेप्ती कांदा मार्केटमध्ये रोटेशन पद्धतीने लिलाव सुरु करण्यात आले. पहिल्याच लिलावाला सुमारे 20 हजार गोण्यांची आवक झाली होती, तर या लिलावात गावरान कांद्याला 82 रुपये किलो व लाल कांद्याला 62 रुपये प्रतिकिलोचा उच्चांकी दर मिळाला.
एकाच वेळी सहा ठिकाणी लिलाव
बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांना आवाहन रोटेशन पद्धतीने लिलाव होणार असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या कांद्याला चांगला भाव मिळणार असून शेतकऱ्यांनी लिलावाच्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत कांदा विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे संचालक संतोष म्हस्के, अभिलाष घिगे यांनी केले आहे. एकाच वेळी सहा ठिकाणी लिलाव सुरु होणार असल्याने शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वत:च्या आडतीवर बोली लावता येणार नाही
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारपासून रोटेशन पद्धतीने कांदा लिलाव सुरु झाले. बाजार समितीत 104 अधिकृत व्यापारी असून त्यातील काही व्यापारी आडतदारही आहेत. स्वत:च्या आडतीवर त्या आडत-व्यापार्याला कांदा खरेदी करता येणार नसल्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. शेतकऱ्याला आपला मालाचा लिलाव कसा होतोय हे समजावे यासाठी आजूबाजूला असलेल्या शेतकर्यांना सुचना म्हणून लिलावाच्या 15 मीनिट अगोदर सायरन वाजविले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लिलाव सुरू होणार असल्याचे एक प्रकारे सुचना मिळणार असल्याचे संचालक संतोष म्हस्के यांनी सांगितले.






























































