नगरमध्ये सर्वांना सोबत घेऊन कामकाज करणार, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पदभार स्वीकारला

जिल्ह्यातील विविध प्रश्नांची मला माहिती आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन कामकाज करणार असल्याचे नगरचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, पिकांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे केले जातील. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. राजेंद्र भोसले यांनी मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, मी 2014 साली नगर जिह्यात अपर जिल्हाधिकारी होतो. त्यामुळे जिह्याची मला माहिती आहे. सध्या कोरोनाचे वातावरण आहे. येथे त्याचे प्रमाण कमी होत आहे. याची मी माहिती घेतली आहे. जिह्यामधील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असून, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.

नगर जिह्यातील चार तालुक्यांमध्ये पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरित होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. ते तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त पंचनामे लवकर करण्याच्या सूचना प्रशासनाला देणार आहे. उद्या पालकमंत्र्यांसोबत पीक नुकसानीचा दौरा आहे. त्यानंतर सर्व विभागांची बैठक घेऊन जिह्यातील आढावा घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या