
डेल्टा प्लस विषाणूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आजपासून निर्बंधाची अंमलबजावणी सुरू केली आहे. दुपारी चारनंतर दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी राहणार आहे. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.
नगर जिल्ह्यात एप्रिल मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेने कहर केला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दररोज चार हजार रुग्ण आढळून येत होते. मात्र, जून महिन्यापासून कोरोना उतरंडीला लागला. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या बाधितांची संख्या घटली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने 7 जूनपासून ‘अनलॉक’ करण्यात आला होता. मात्र, पुन्हा डेल्टा प्लस विषाणूने चिंतेत भर टाकली आहे. या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नव्याने नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू राहणार आहे.
राहात्यात आजपासून दंडात्मक कारवाई
राहाता शहरात निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू असल्याने पोलीस व नगरपरिषदेच्या प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलताच व्यावसायिकांची मोठी धावपळ उडाली. पहिल्या दिवशी प्रशासनाने संयमी भूमिका घेतली असून, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई करणार असल्याच्या सूचना व्यावसायिकांना दिल्या आहेत.
दुकानांसाठी सायंकाळी चारच्या ऐवजी सहाची वेळ द्यायला हवी होती. सकाळी सात वाजता ग्राहक येत नसल्याने दुकाने उघडली जात नाहीत. दुकाने सकाळी दहा वाजता उघडली जातात. त्यामुळे तीन तास वाया जातात. कोरोनाच्या संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन तीन ते चार दिवसांनंतर दुकानांची वेळ वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य सरकारला निवेदन दिले जाणार आहे.
– किरण व्होरा, सेक्रेटरी, एमजी रोड व्यापारी असोसिएशन.






























































