नगर जिल्ह्यात बाजार समित्या बंदचा कांदा उत्पादकांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
onion-market

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने कांदा लिलाव बंद आहेत. मात्र, विक्रीला व शेतात पडून असलेला दोन व तीन नंबरचा कांदा खराब झाला आहे. ठराविक व्यापारी बांधावर जाऊन नडलेल्या शेतकऱयांचा कांदा खरेदी करतात. परंतु, भाव नसल्याने शेतकऱयांना प्रतिकिलो सहा ते सात रुपयांचा फटका बसत आहे.

नगर जिल्ह्यात वर्षभरात कांद्याचे एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. यंदा पाण्याची उपलब्धता बऱयापैकी असल्याने कांदा उत्पादनाचे क्षेत्र 1 लाख 80 हजार हेक्टरपर्यंत गेले. रब्बीतच यंदा दीड लाख हेक्टरच्या वर क्षेत्र होते. खरिपाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल ते जुलैपर्यंत बाजार समितीत आवक होत असते. बाजार समित्यांत आठवडय़ात तीन दिवस कांद्याचे लिलाव होतात. मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या दराचा विचार करता एका लिलावाला सरासरी जिल्ह्यात बारा ते पंधरा कोटींची उलाढाल होते.

यंदा बियाणांतील दोषामुळे अनेक ठिकाणी गावराणऐवजी दुसरेच बियाणे निघाले. हा कांदा फार दिवस टिकणार नाही. याशिवाय कांदा साठवण्याची अनेक शेतकऱयांना पुरेशी सोय नाही. त्यामुळे दोन व तीन नंबरच्या कांद्याची शेतकरी काढणीनंतर ते लगेच विक्री करतात. मात्र, बाजार समित्या बंद असल्याने कांदा बांधावर पडून आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणही पावसाळी असल्याने कांद्याची नासाडी झाली. खरिपामुळे कांदा विकण्याची गरज असलेला शेतकरी खासगी व्यापाऱयाला विक्रीसाठी शोधत आहेत. खासगी व्यापारीही शेतकऱयांची नड बघून पाच ते सहा रुपयांनी दर पाडून मागत असल्याने शेतकऱयांचे नुकसान होत आहे.

बाजार समित्या बंद असल्याने बाजार समिती तसेच शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे सर्व नियमांच्या अधीन राहून आठवडय़ात किमान दोन दिवस बाजार समित्या सुरू ठेवण्याला परवानगी देण्याची आम्ही जिल्हाधिकाऱयांकडे मागणी केली आहे. – प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर.

दोनशे कोटींची उलाढाल ठप्प

 बाजार समित्या बंद असलेल्या दिवसांतील बंदच्या काळात होणाऱया नुकसानीची व थांबलेल्या उलाढालीची निश्चित आकडेवारी प्रशासनाकडे नाही. मात्र, जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार 200 कोटींपेक्षा अधिक रकमेची कांद्यातून होणारी उलाढाल थांबली आहे. शेतकऱयांकडील कांद्याची नासाडी, पाडलेले दर व अन्य कारणांतून कोटय़वधींचे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाजार समित्यांच्या 40 लाखांच्या उत्पन्नालाही फटका बसला आहे.