
जिल्ह्यात वाळूतस्करीसह चोऱ्य़ा, घरफोडी, दरोडे असे संघटित गुन्हे करणाऱ्य़ा 387 टोळ्या असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या टोळ्यांनी त्यांचे वर्तन सुधारले नाही, तर या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याअंतर्गत कारवाई होणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला.
नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘टू प्लस’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. त्याची महिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.
नगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व संबंधित आरोपींवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात जानेवारी 2021पासून ‘टू प्लस’ योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेसाठी जिल्ह्यात मालविषयक, शरीरविषयक, तसेच वाळूविषयक अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्य़ा व ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा सराईत गुन्हेगारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच कमी कालावधीत ‘टू-प्लस’ योजनेसाठी लागणारी माहिती तत्काळ उपलब्ध होण्यासाठी पोलीस अधीक्षक पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या स्तरावर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेत एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस अंमलदार यांची पथक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मालविषयक दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची 2011पासूनची माहिती संकलित करण्यात आली. तसेच शरीरविषयक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची 2015पासूनची माहिती संकलित करण्यात आली. संकलित केलेली माहिती ‘टू प्लस’ योजनेच्या वेबसाइटवर भरण्यात आली आहे. जिल्ह्यात जानेवारी 2021पासून ‘टू प्लस’ योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीला तीन हजार 841 आरोपींचा ‘टू प्लस’मध्ये समावेश करून त्यांची संकलित केलेली माहिती ‘टू प्लस’च्या वेबसाइटवर भरण्यात आली होती. जानेवारी 2021पासून दैनंदिन अटक आरोपींमधून नव्याने 437 आरोपी निष्पन्न करण्यात आले असून, आजवर चार हजार 278 आरोपींची माहिती वेबसाइटवर भरण्यात आली आहे.
‘टू प्लस’ योजना अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱयांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अनिल कटके व ‘टू-प्लस’ पथकातील पोलीस अंमलदारांनी राबविलेली आहे.
‘मोक्का’च्या 6 प्रस्तावांना विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-56नुसार 24 प्रस्ताव कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱयांकडे पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-57 नुसार दोन प्रस्ताव कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱयांकडे पाठविण्यात आले आहेत. ‘एमपीडीए’नुसार प्रस्ताव प्राप्त असून, एका आरोपीला स्थानबद्ध करण्यात आले आहे, तर पाच प्रस्ताव अंतिम मंजुरीस आहेत. संघटित गुन्हेगारी अधिनियम(मोक्का)अंतर्गत सहा प्रस्ताव प्राप्त असून, सर्व प्रस्तावांना नाशिक परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. त्यांपैकी अपर पोलीस महासंचालकांनी तीन प्रस्तावांसाठी दोषारोपपत्र पाठविण्याची परवानगी दिली आहे.
‘सीसीटीएनए’ प्रणालीत नगर जिल्हा राज्यात अव्वल
गुन्ह्याची नोंद, आरोपींचा शोध, पुराव्यांचे संकलन, न्यायालयात दोषारोपपत्र व अनुषंगिक 42 मुद्दय़ांच्या ‘क्राइम ऍण्ड क्रिमिनल ट्रकिंग नेटवर्क सिस्टीम’ (सीसीटीएनएम) प्रणालीत नगर जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकविल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.
आरोपी मेळावे घेऊन दिला कायदेशीर कारवाईचा इशारा
जिल्ह्यात जानेवारी 2021पासून ‘टू प्लस’ योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीला चार हजार 278 आरोपींचा ‘टू प्लस’मध्ये समावेश करण्यात आला. या आरोपींचे मतपरिवर्तन करण्यासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आरोपींचे मेळावे घेण्यात आले. यापुढे गुन्ह्यामध्ये सहभाग आढळल्यास अन्य कायदेशीर कारवाईची जाणीव करून देण्यात आली.





























































