नगरमधील सर्वच पोलीस ठाण्यांत आता सीसीटीव्हीची ‘नजर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व 31 पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे 330 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. दरम्यान, यामुळे पोलीस ठाण्यांत कामचुकारपणा करणाऱया कर्मचाऱयांनाही चाप बसणार आहे.

राज्यभरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ज्या पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नव्हते, त्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काम पूर्ण करण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते व सध्या ते कार्यरत नाहीत किंवा नादुरुस्त आहेत, अशा ठिकाणी दुसऱया टप्प्यात नव्याने सीसीटीव्ही बसविण्यास सुरुवात झाली आहे. नगर जिल्ह्यात ‘सुजाता कॉम्प्युटर्स’ या संस्थेमार्फत सर्व 31 पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हाय डेफिनेशन कॅमेरे बसविण्याचा आदेश देण्यात आला आहे. यात नगर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात 12, भिंगार पोलीस ठाण्यात 12, नगर तालुका 12, तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी 15 व ‘दिलासा सेल’मध्ये 12 कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.