नगरमध्ये रेशनचा काळा बाजार, 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला सुमारे पावणे आठ लाखाचा अवैध धान्य साठा कोतवाली पोलिस तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने शनिवारी जप्त केला. शहरातील मार्केट यार्ड तसेच केंडगाव इंडस्ट्रीज इस्टेट अशा दोन ठिकाणी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकान व गोदामवर शनिवारी दुपारी छापा टाकून धान्य व सहा वाहने मिळून सुमारे 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी मार्केट यार्डमधील 2 दुकाने व केडगाव येथील संबंधित गोडाऊन सील केले आहे.

या दोन्ही प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये सुरेश रासकर, संग्राम रासकर, आसाराम रासकर, व्यवस्थापक जालिंदर चितळे यांच्यासह दोन वाहन चालक आशा सहा जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 419 गोण्या तांदूळ व 125 गोण्या गहू असा माल मार्केट यार्ड येथील दुकानातून जप्त केला. तर केडगाव येथील गोदामात 132 गोण्या तांदूळ, 247 गोण्या गहू व बारदाण्यात गहू भरलेल्या 47 गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा सगळा धान्यसाठा हरियाणा व मध्यप्रदेश राज्यातील रेशनिंगचा आहे, पोलिसांनी या धान्यासह रेशनिंग धान्याच्या रिकाम्या गोण्या, 4 ट्रक व एक छोटा हत्ती, एक पिकअप वाहन असा सर्व मिळून 42 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नगर शहरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ सर्रासपणे काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी अवैधरित्या साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर मार्केट यार्ड येथील सुरेश ट्रेडिंग कंपनी व सोहम ट्रेडीग कंपनी या दोन्ही दुकानावर आधी छापा टाकण्यात आला. ही दोन्ही दुकाने सुरेश रासकर यांच्या नावावर आहेत. पोलिसांनी या ठिकाणी मुद्देमाल हस्तगत करून त्या ठिकाणी असलेली बिलांची तपासणी सुरू केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या