नगर मनपाने दुरूस्ती केलेल्या रस्त्यांची विनापरवाना खोदाई, मोबाईल कंपनीवर कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेने नागापूर, बोल्हेगाव परिसरात लाखो रुपये खर्चून रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे केली आहेत; परंतु खासगी मोबाईल कंपनीने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता, या रस्त्यांची खोदाई करून ऑप्टिकल फायबर केबल आणि पोल टाकले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या चांगल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सभागृहनेते अशोक बडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

महापालिकाहद्दीमधील नागापूर, बोल्हेगाव परिसरामध्ये खासगी मोबाईल कंपनीने अनधिकृतपणे अनेक ठिकाणी ऑप्टिकल फायबर केबल आणि पोल टाकले आहेत. ओएसी टाकताना अनेक चांगल्या रस्त्यांची खोदाई केलेली आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे केलेली असून, मनपाचा पैसा विनाकारण वाया जात आहे. कंपनीने मनपाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नागापूर, बोल्हेगाव परिसरातील चांगल्या रस्त्यांची खोदाई करून ठेवली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यावरील खड्डय़ांचा दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडत आहेत. नागरिकांची समस्या लक्षात घेता, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे आवश्यक आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील नागापूर, बोल्हेगाव परिसरात अनधिकृतपणे टाकलेल्या फायबर पोलमुळे महापालिकेच्या चांगल्या रस्त्यांची दुरवस्था झालेली असून, याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी बडे यांनी निवेदनात केली आहे.