नगर – शेतमजुराच्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात आई-वडिलांसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी कंटेनर आणि दुचाकींच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली. नगरच्या पारनेर तालुक्यातील वडगाव गावातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात आई-वडिलांसह दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिराने एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे

अनिल बाळासाहेब पवार (20), सोनाली अनिल पवार (22), माउली अनिल पवार आणि एक सहा महिन्यांची मुलगी (सर्व रा. वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) अशी दुचाकीवरील मृतांची नावे आहेत.

इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरने पुढे चाललेल्या मोपेड दुचाकी तसेच दुसरी दुचाकी यांना पाठीमागून जोराची धडक दिली. ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली. त्यामध्ये मोपेड दुचाकीवरील चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड (रा. पांगरमल, ता. नगर) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. कांदा काढणीसाठी कापूरवाडीला वास्तव्य होते. वडगाव सावताळचे पवार कुटुंब हे कापूरवाडी (ता. नगर) येथे कांदा काढणीच्या कामासाठी एक ते दीड महिन्यापासून नगर तालुक्यात होते. मयत अनिल पवार यांची सासूरवाडी घोडेगाव (ता. नेवासा) येथील आहे. तयांच्या मागे आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. एकाच वेळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे वडगाव सावताळ गावावर शोककळा पसरली आहे.