बँकेवर पडला दरोडा, 5 मिनिटात जमले पाचशे नागरिक; चोरट्यांना शिताफीने पकडलं, पण…

‘तीन चोरटे आले असून गावातील बँकेवर दरोडा पडलाय, चोरट्यांनी काळे जर्किंन घातले असून बँक लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असा फोन ग्रामस्थांना आला. अवघ्या पाच मिनिटात पाचशेच्यावर लोक बँकेसमोर गोळा झाले. पोलीसहही आले व त्यांनी बँकेला घेरून चोरट्यांना पकडले. नगर तालुक्यातील शेंडी गावात बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा थरार रंगला, अर्थात ही प्रत्यक्ष घटना नव्हती तर पोलिसांनी नव्याने सुरू केलेल्या ग्रामसुरक्षा यंत्रणेचे हे प्रात्यक्षिक होते.

बुधवारी सकाळी मोबाईलवर संदेश मिळाल्यावर अवघ्या मिनिटांमध्ये पोलूस यंत्रणा, गावकरी शेंडीच्या इंडियन ओव्हरसीज बँकेजवळ जमली आणि त्यांनी दरोडा टाकणाऱ्या तीन जणांना मोठ्या शिताफीने पकडले. सदरचा प्रकार हा पोलीस यंत्रणेने सराव म्हणजे ‘मॉक ड्रिल’ आहे असे समजले, तेव्हा ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.

गावामध्ये दरोडा पडला किंवा नैसर्गिक आपत्ती व अन्य काही घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने संबंधित ठिकाणी पोहोचते हे पाहण्यासाठी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामसुरक्षा योजनी राबवली जात आहे. गावकरी व पोलिसांना एकाच वेळी घटना समजावी हा यामागील उद्देश आहे.

असे रंगले ‘मॉक ड्रिल’

बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास शेंडी गावातील इंडियन ओव्हरसीज बँकेत नियमित आर्थिक व्यवहार सुरु असताना तीन अज्ञात हत्यारबंद इसम बँकेत दरोड्याच्या उद्देशाने प्रवेश करतात. बँकेशेजारील दुकानदाराच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबरवर (18002703600) कॉल करून सर्व गावाला सावध केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तत्काळ शेंडी गावाच्या हद्दीतील 1500 नागरिक, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे सर्व 55 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाही घटनेची माहिती व दरोडेखोरांचे वर्णन कळाले. पोलिसांनीही ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले 10 मिनिटांत गावात पोलीस हजर झाले. पोलिसांनी बँकेला घेराव घातला. पोलिसांनी दरोडेखोरांना बँकेतून बाहेर येण्याचे वारंवार आवाहन केले. बँकेतून दरोडेखोर बाहेर येताच उपस्थित नागरिक व पोलिसांनी सदर चोरांना जेरबंद केले व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट

– घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
– गावातील कार्यक्रम/घटना विना विलंब नागरिकांना एकाच वेळी कळणे.
– अफवांना आळा घालणे.
– प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
– पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यस्था कायम राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे.

आपली प्रतिक्रिया द्या