
तालुक्यातील चिंभळा परिसरात रविवारी (दि. 20) पहाटे एका घरावर दरोडा टाकत दरोडेखोरांनी पंचाहत्तर वर्षीय वृद्धेचे दोन्ही कान तोडून कानातील दागिन्यांसह 50 हजारांचा मुद्देमाल हिसकावून नेला.
महादेव जाधव यांच्या घरावर रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी घराची कडी वाजवत दरवाजा उघडण्यास धमकावले. जाधव यांनी दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी पंचाहत्तर वर्षीय विमल महादेव चौधरी यांना जबर मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने घेण्यास सुरुवात केली. त्याला विमल यांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी त्यांचे दोन्ही कान तोडून कानातील काढून घेतले, तसेच गळ्यातील मंगळसूत्र व चांदीचे दागिने असा एकूण 50 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकही बोलविण्यात आले. मात्र, दरोडेखोरांचा माग मिळाला नाही.























































