नगरकरांना हुडहुडी; तापमान 11 अंशांच्या खाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच, दुसरीकडे नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात हुडहुडी भरली असून, काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे नगरकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, नगरमध्ये कमाल तापमानाची नोंद 11 अंश सेल्सिअस झाली आहे. सर्वात कमी तापमान निफाड येथे 7.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

राज्यात पुढील चार दिवस थंडीचे असणार आहेत. हवामानातील कोरडेपणा वाढला असून, रात्रीचे तापमान मोठय़ा प्रमाणात कमी होत आहे. यामुळे गारठा वाढणार आहे. ही स्थिती चार दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. तो अंदाज खरा ठरला आहे. दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत हुडहुडी भरली आहे. नगर जिह्यातही तीच स्थिती आहे. काल कमाल तापमानाची नोंद 11 अंश सेल्सिअस नोंदवली गेली आहे. थंडीचा पारा खाली आल्याने रात्रीच्या वेळी शेकोटय़ा पेटविल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी कान टोपी व स्वेटर असे उबदार कपडे घालून नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत. या वाढत्या थंडीचा गहू, हरभरा व अन्य पिकांना लाभ होणार असला, तरी द्राक्षमण्यांना तडे जाण्याच्या शक्यतेने द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत.