
शरीरसंबंधाचे आमिष दाखवून, त्याचा व्हिडीओ बनविल्यानंतर तो व्हायरल करण्याची भीती दाखवून 2 लाख रुपये खंडणी मागणाऱ्य़ा एका महिलेला तिच्या साथीदारासह अकोले पोलिसांनी अटक केली आहे. यात सहभागी असणारी दुसरी महिला मात्र फरार झाली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पीडित व्यक्ती अकोले तालुक्यातील असून, त्याच्याकडून खंडणी वसूल करणारी टोळी संगमनेर तालुक्यातील आहे.
अकोले तालुक्यातील एका प्रतिष्ठत व्यक्तीला संगमनेर तालुक्यातील दोन महिला व एका पुरुषाने गोड बोलून एका महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. हे शारीरिक संबंध होत असताना त्याचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी करण्यात येऊ लागली. दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून बळजबरीने एटीएममधून 30 हजार रुपये काढून घेण्यात आले. यावेळी त्याला मारहाणही करण्यात आली.
यानंतरही अश्लील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करून बदनामीची धमकी देत पैशांची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे या व्यक्तीने अकोले पोलिसात फिर्याद दिली. यावरून अकोले पोलिसांनी फिर्यादीला दहा हजार रुपये देऊन सापळा रचला. मंगळवारी दुपारी एका चारचाकी गाडीतून आरोपी खंडणीची रक्कम घेण्यासाठी सुगाव येथे आले. पीडित व्यक्तीकडून पैसे घेत असतानाच पोलिसांनी झडप घालून एका महिलेसह पुरुषाला ताब्यात घेतले. न्यायालयाने आज या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. साबळे, पोलीस नाईक कोरडे, बडे, आहेर महिला पोलीस थिटमे, पानसरे, आहेर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
आणखी एका महिलेचा सहभाग
अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींबरोबरच आणखी एक महिला आरोपी यात सहभागी असल्याचा पोलिसांचा अंदाज असून, त्या महिलेचा शोध सुरू आहे. सदर महिला ही नगर जिल्ह्यातील असून, ती पसार झाली आहे.




























































