नगर अर्बन बँक सोने तारण घोटाळा- पोलिसांसमोर 160 जणांना पकडण्याचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत घडलेल्या बनावट सोने तारण ठेवून त्यावर कोटय़वधीचे कर्ज उचलून त्याची परतफेड न करण्याच्या प्रकरणातील गोल्ड व्हॅल्युअर विशाल दहिवाळकर व 159 कर्जदार असे मिळून 160 जणांना पकडण्याचे आव्हान शेवगाव पोलिसांसमोर आहे. दरम्यान, नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळ्यांबाबतचा तिसरा गुन्हा आता दाखल झाल्याने आणखी असे किती गुन्हे दाखल होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

मागील तीन वर्षांपासून चर्चेत असलेला शेवगाव शाखेतील सोनेतारण घोटाळा पोलिसांपर्यंत पोहोचतो की नाही, याची शंका होती. हा घोटाळा उघड करणारे शेवगाव शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गोरक्षनाथ शिंदे यांनी आत्महत्या केल्याने या घोटाळ्याची व तो दाबण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची व्याप्ती समोर आली होती.

बँकेच्या संचालक मंडळाने या सोनेतारण घोटाळ्यावर कारवाई करण्याचे टाळल्याने शेवगावच्या बेकायदेशीर सावकारी व राजकीय दबावाची ताकदही चर्चेत होती. या पार्श्वभूमीवर 2017मध्ये तारण ठेवलेल्या बनावट सोन्याबाबत 2018मध्ये संशय येऊनही प्रत्यक्षात तो जून 2021मध्ये उघड झाला. त्यानंतर 2 ऑगस्ट 2021 रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. 27 किलो 351 ग्रॅम सोने खरे असल्याचे भासवून तेवढय़ा वजनाचे बेन्टेक्सचे दागिने तारण ठेवले गेले. यातून तब्बल 5 कोटी 30 हजारांचे कर्ज उचलून नंतर त्याची परतफेडही केली नाही, तसेच तारण ठेवलेले दागिनेही सोडवून नेले नाहीत.

बँकेच्या शेवगाव शाखेत गोल्ड व्हॅल्युअर म्हणून विशाल दहिवाळकर 2008 ते 31 मार्च 2020पर्यंत म्हणजे तब्बल 12 वर्षे काम करीत होता. त्यानेच तारण ठेवण्यासाठी आलेल्या सोन्याची तपासणी व मूल्यांकन करून त्याचा अहवाल दिल्यानंतर बँकेने त्या मूल्यांकनाच्या 75 टक्के रक्कम संबंधित कर्जदाराला दिली आहे. 51 हजारांपासून 11 लाखांपर्यंतचे कर्ज यात दिले गेले आहे. सोन्याची तपासणी व मूल्यांकन करणाऱया गोल्ड व्हॅल्युअरवर विश्वास ठेवून बँकेने कर्ज वितरण केले असल्याने या बनावट सोने प्रकरणात दहिवाळकर यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे.

बँकेचा तिसरा गुन्हा

नगर अर्बन बँकेचे संचालक मंडळ दोन वर्षांपूर्वी बरखास्त होऊन प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. यानंतर पिंपरी- चिंचवड शाखेतील 22 कोटीच्या कर्ज फसवणुकीचा व नंतर नगर येथील मुख्यालय शाखेतील 3 कोटीच्या चिल्लर घोटाळ्याचे गुन्हे पोलिसात दाखल आहेत. या दोन्ही प्रकरणात काही माजी संचालक, बँकेचे कर्मचारी व कर्जदारांना अटक झाली आहे, तर काही माजी संचालकांनी अटकपूर्व जामीन मिळवले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शेवगावच्या बनावट सोनेतारण प्रकरणात 160 आरोपी असून, या सर्वांनी मिळून बँकेची 5 कोटी 30 लाखांची फसवणूक केली आहे.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण फसवणूक प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअर व 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱया दिवशी शेवगाव पोलिसांनी अर्बन बँकेच्या शाखेत जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या संदर्भातील चौकशीसाठी लागणारे कागदपत्रे शाखेतून हस्तगत केली असून, गैरव्यवहारातील रक्कम ही 50 लाखांपेक्षा जास्त असल्याने हा गुन्हा नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत.

शिंदे यांच्या आत्महत्येची प्राथमिक चौकशी

शाखा व्यवस्थापक शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणाची पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल आहुजा, बँक बचाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली, तर अर्बन बँकेच्या नगर मुख्य शाखेतील सहायक व्यवस्थापक व चौकशी अधिकारी मनोज फिरोदिया हे चौकशीस उपस्थित राहिले नाहीत.